सातारा दि. 26 : राष्ट्रीय महामार्ग पुणे-बेंगलोर वरील आनेवाडी व तासवडे टोल प्लाझा वरील स्थानिक नागरिकांना टोलच्या अनियमिततेबाबत होणाऱ्या अडचणीसंदर्भात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरीय अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधिक्षक समिर शेख, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, टोल प्लाझाचे व्यवस्थापक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री. देसाई म्हणाले, टोल नाका चालविणाऱ्या कंपन्यांवर कोणकोणते व किती गुन्हे दाखल आहेत याची माहिती पोलीस विभागाने सादर करावी. टोल नाक्यावरील सीसीटिव्हींची जोडणी जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधिक्षक कार्यालय यांना देण्याची व्यवस्था आठ दिवसात करावी जेणेकरुन टोल नाक्यावरील प्रत्येक हालचालींवर सतत देखरेख ठेवता येईल व होणाऱ्या गंभीर घटनांच्या बाबतीत तात्काळ कार्यवाही करता येईल.
आनेवाडी व तासवडे टोल नाक्यावर टोलच्या अनियमिततेबाबत स्थानिक नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने ठेकेदार कंपनीबाबत मागील काही वर्षात आलेल्या तक्रारींचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिले.