‘शासन आपल्या दारी’ अभियान एक क्रांतिकारी निर्णय -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

औरंगाबाद दि २६ (जिमाका)- सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागू नये म्हणून राज्य सरकारने  ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना एकाच छताखाली अनेक योजनांचा लाभ मिळत असल्याने हा उपक्रम राबविण्याचा निर्णय क्रांतिकारी ठरत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्य शासनाने सुरु केलेल्या  ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे , कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे, रमेश बोरनारे , उदय सिंग राजपूत, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना आदी उपस्थित होते.

शासकीय योजना सुलभपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियान राज्यात राबविण्यात येत असून लाखो नागरिकांना त्याचा लाभ मिळतो आहे. आज जिल्ह्यातील १ लाख ४९ हजार ५७२ लाभार्थ्यांना  ५ हजार ४५७ कोटी रुपयांच्या  निधीचे वाटप होत आहे. शासनाने जलसिंचनाच्या  २८ प्रलंबित योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे ६ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.  ‘नमो शेतकरी सन्मान योजना’ बळीराजाला लाभदायी ठरत आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे  म्हणाले.

सर्वसामान्यांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे आणि समाजातील सर्वच घटकांचे हे सरकार असून त्यांच्या हिताचे हिताचे अनेक निर्णय हे सरकार घेत आहे. केंद्राप्रमाणे राज्यामध्ये ‘नमो शेतकरी सन्मान योजना’ राबविण्यात येत असून केंद्राप्रमाणे राज्यानेही ६ हजार रुपयांची मदत दिलेली आहे. आकांक्षित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील १५ हजार  रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. एनडीआरएफच्या नियमात बदल करून ही मदत  दुपटीने वाढवून आता तीन हेक्टर करण्यात आली आहे. गोगलगायींमुळे शेतीच्या नुकसानीचीदेखील आता भरपाई शासन देत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जोडधंदे करण्यासाठी वाढीव निधी देण्यात येत आहे. मागेल त्याला शेततळे, ठिबक सिंचन, अस्तरीकरण अशा अनेक योजनासाठी शासन निधी देण्यात येत आहे, असे सांगून  मनरेगाअंतर्गत  १० लाख शेतकऱ्यांना  लाभ मिळाला आहे. शेतकऱ्यांसाठी काही नियम शिथिल केले आहेत. शासन बळीराजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

राज्याच्या विकासाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पाठबळ आहे. कृषी क्षेत्रातील पायाभूत विकासासाठी  २० हजार कोटी तर रेल्वे तसेच रस्ते विकासासाठी १३०० कोटी रुपये दिले आहेत.  मराठवाड्यातील महत्वाकांक्षी वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी केंद्राकडे निधीची मागणी करणार आहोत, आणि केंद्र सरकार नक्कीच भरीव निधी देईल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या नेतृत्वामुळे देशाची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावरून ५ व्या क्रमांकावर आलेली आहे. ही आपल्या देशाची  प्रगती आहे. जी- २० चे  अध्यक्षपद आपल्याला मिळाले हा देखील आपला सन्मान आहे, हे सांगून केंद्राच्या आणि राज्याच्या माध्यमातून गरिबांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले, जनतेला केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजनाचा लाभ देण्यात येत आहे. नमो किसान सन्मान योजना, पीक विमा योजना, जनधन योजनेचा लाभ घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. प्रधानमंत्री आयुष्मान योजनेंतर्गत देशात ५० कोटी लोकांनी योजनांचा लाभ घेतला आहे. केंद्र सरकारने कृषि क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटी रुपयांचा निधी ठेवलेला असल्याचेही ते म्हणाले.

‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे  सर्व यंत्रणांनी उत्तम प्रकारे केले आहे. या उपक्रमामुळे अनेक लाभार्थ्यांना विविध प्रकारचा लाभ मिळणार आहे. नागरिकांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केले.

या उपक्रमाच्या माध्यमातून आज अनेक लाभार्थ्यांना विविध विभागांच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळत आहे.  कै. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या माध्यमातून १०० दिवसाच्या आत २ लाख रुपयांची मदत मयताच्या  कुटुंबांना मिळत आहे. आज या उपक्रमाच्या माध्यमातून १ लाख २५ हजार लोकांना एकाचवेळी लाभ मिळणार आहे, असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

सहकार मंत्री अतुल सावे म्हणाले, राज्यात अनेक विकासाची कामे सुरू आहेत. जल जीवन मिशन ही महत्वकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ राज्यातील जनतेला मिळत आहेत. शेतकऱ्यांना १ रुपयात  विमा संरक्षण मिळत आहे तर  ५ लाखांचा आरोग्य विमा देखील मिळत आहे. सहकार विभागाच्या महात्मा ज्योतिबा फुले सन्मान योजनेचे अनेक लाभार्थी आहेत. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. शासनाने ६९ हजार हेक्टर जमीन कर्जमुक्त केली असल्याचेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले. ते म्हणाले, ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकारी शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी जनतेच्या दारात जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत. महसूल विभागांतर्गत १७ हजार २४८, ग्रामविकास विभाग ११ हजार ५४५ , कृषी विभाग ६४ हजार १८४, नगरविकास विभाग ११ हजार ८१४ अशा अनेक विभागाच्या योजनांचा लाभ देण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात लाभवस्तू व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ उपलब्ध करुन देण्यात आला. देशसेवेमध्ये विशेष कार्यामुळे नवल भाऊसाहेब दफादार यांना ‘मेन्शन इस डिसपॅच’ पदक देवून तसेच राजाभाऊ दगडुबा करपे यांना घेतलेल्या कर्जावर तीन लाख रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले. महसूल व सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांचे देखील वितरण करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील ‘ग्रामसुरक्षा दला’च्या हेल्पलाईनचा देखील शुभारंभ यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

0000

क्षणचित्रे-

  • कन्नड येथे कार्यक्रमस्थळी शासनाच्या विविध विभागांच्या योजना, उपक्रमांची माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात आले होते, या स्टॉल्सवर नाग़रिकांनी मोठी गर्दी केली होती.
  • कृषि, उद्योग, ग्रामविकास, शिक्षण आदी विभागांच्या योजनांमधील ट्रॅक्टर्स, व्यावसायिक वाहने, हार्वेस्टर यंत्रांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
  • सर्व स्टॉल्सला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली.