पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पद्मश्री ग.दि.माडगुळकर स्मारक कामाचा शुभारंभ

0
9

पुणे, दि.२७ : पुणे महानगरपालिकेतर्फे कोथरूड येथे उभारण्यात येणाऱ्या पद्मश्री ग. दि. माडगुळकर स्मारक कामाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाला आमदार भीमराव तापकीर, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सुमित्र माडगूळकर, प्राजक्ता माडगूळकर, माधुरी सहस्त्रबुद्धे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, गीतरामायणामुळे समाजाला रामायण सुलभपणे समजले. अशा साहित्यकृतीचे रचनाकार असलेल्या गदिमांचे स्मारक केवळ कवी-लेखकाचे स्मारक नसून त्यांच्याप्रती असलेली ही श्रद्धा आहे.  माडगुळकर कुटुंबियांच्या सूचनेनुसार आवश्यकता असल्यास स्मारकासाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि गदिमांच्या कार्याला साजेसे स्मारक उभारण्यात येईल. अनेक साहित्यप्रेमी श्रद्धेने हे स्मारक पूर्ण झाल्यावर भेट देतील. महापालिकेने  स्मारकाचे काम एक वर्षात पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

आमदार तापकीर म्हणाले, गदिमांनी साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांच्यासारख्या थोर साहित्यिकाचे स्मरण होणे आणि पुढील पिढीला यांच्या कार्याचा परिचय करून देण्यासाठी स्मारक उभारण्यात येत आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात हे काम सुरू होत असल्याचा आनंद असल्याचे ते म्हणाले.

सुमित्र माडगुळकर यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. प्रास्ताविकात श्री.ढाकणे म्हणाले, महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेल्या ग.दि.माडगुळकर यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी महानगरपालिकेतर्फे त्यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. गदिमांच्या स्मारकाच्या माध्यमातून मराठी भाषेतील त्यांचे लेखनकार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. स्मारकात गीतरामायण दालन, वैयक्तिक दालन, चित्रपट दालन, साहित्य दालन, डिजिटल दालन, कॅफेटेरिया आदी विविध कामांचा समावेश आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

गुणवान खेळाडूंना सरावासाठी सर्व सहकार्य – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

जिल्ह्यातील होतकरू आणि गुणवान खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न बाळगून नियमित सराव करावा; त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

कै. बाबुराव सणस मैदानावर तयार करण्यात आलेल्या ४०० मीटर ८ लेन सिंथेटिक ट्रॅकच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार भीमराव तापकीर, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, विकास ढाकणे, उपायुक्त राजीव नंदकर, हेमंत रासने, अजय खेडेकर, स्मिता वस्ते, अभय छाजेड आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, खेळाडूंनी राज्य किंवा राष्ट्रीय स्तरापर्यंत न थांबता आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची जिद्द बाळगावी. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी खेळाडूंना राज्य शासनातर्फे प्रोत्साहन देण्यात येत आहे. यशस्वी खेळाडूंना शासनसेवेत अधिकारी म्हणून घेण्यात आले आहे. खेळाडूंनी त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा. प्रशिक्षकांनी त्यांच्याकडून उत्तम सराव करून घ्यावा. खेळाडूंना सरावासाठी काहीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात श्री.ढाकणे यांनी सिंथेटिक ट्रॅकविषयी माहिती दिली. पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा पाचवा सिंथेटिक ट्रॅक आहे. या ट्रॅकमुळे शहरातील मध्यवर्ती भागातील खेळाडूंना सरावाची चांगली सुविधा होईल, असे त्यांनी सांगितले.

श्री.खेडेकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते क्रीडा प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच उद्घाटन प्रसंगी घेण्यात आलेल्या १०० मीटर धावण्याच्या प्रात्यक्षिक स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यांनी खेळाडूंशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले.  कार्यक्रमाला नागरिक, क्रीडा प्रशिक्षक, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here