आषाढी एकादशी पालखीमार्गात भाविकांना स्वच्छता – सुविधांसाठी ग्रामविकास विभागाकडून २१ कोटी रुपये – ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन

0
9

मुंबई, दि. १ : आषाढी एकादशी निमित्त पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांसोबत असणाऱ्या भाविकांना स्वच्छता – सुविधा पुरविण्यासाठी मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था करण्याच्या कामांसाठी २१ कोटी रूपये निधीस  मंजुरी देण्यात आली असल्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी दरवर्षी पायी चालत पंढरपूरला जात असतात, यामध्ये विविध दिंड्यांचाही सहभाग असतो.पालखी सोहळ्यात अनेक ठिकाणी मुक्काम केला जातो. या ठिकाणी वारकऱ्यांना शासनाच्या वतीने सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ही तरतूद करण्यात आली आहे.

पालखी सोहळ्यातील संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सोपान काका महाराज या प्रमुख पालख्यांचा प्रवास जवळपास २२ दिवसांपेक्षा जास्त दिवसांचा असतो. वारकऱ्यांना मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

ग्रामपंचायतींना निर्मल वारीसाठी ४ कोटी २१ लाख रुपये

सोलापूर, पुणे व सातारा जिल्ह्यातील पालखी मार्गातील ग्रामपंचायतींना निर्मल वारीसाठी ४ कोटी २१ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यामध्ये वारी ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमधून जाणार आहे, त्या ग्रामपंचायतीतील स्वच्छता राखणे व भाविकांना सुविधा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचातींवर असणार आहे.

पुणे जिल्हा परिषदेला १७ कोटी ६४ लाख रुपये निधीस मान्यता

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, या निधी मधून संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकोबाराय व संत सोपान देव या पालख्यांसोबत असणाऱ्या भाविकांसाठी तात्पुरते शौचालय, निवारा व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद, पुणे यांनी चालू वर्षात आषाढी वारीनिमित्त शासनास सादर केलेल्या १७ कोटी ६४ लाख रुपये इतक्या निधीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.

000

राजू धोत्रे/वि.सं.अ.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here