जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी ७५ फूट उंचीचा राष्ट्रीय ध्वज उभारणीसाठी प्रयत्नशील – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी दि १(जिमाका):- जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालय येथे 75 फूट तर काही ठिकाणी सुमारे 45 फुट राष्ट्रध्वज येत्या 15 ऑगस्टपर्यंत उभारणीसाठी आपण स्वतः प्रयत्नशील आहोत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

जिल्ह्यातील लांजा, दापोली, मंडणगड, खेड, चिपळूण, राजापूर, संगमेश्वर या तालुका मुख्यालयाच्या तर जिल्ह्यातील इतर ठिकाणी एकाच वेळी हा ध्वज उभारणीचा अभिनव उपक्रम राज्यात पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.

याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा परिषदेकडे देण्यात आली आहे. या अभिनव उपक्रमात जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभाग विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तरित्या सामील व्हावे, असे आवाहन करुन        या अभिनव उपक्रमाची पूर्वतयारी 14 ऑगस्ट पूर्वी करण्यात यावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.  याप्रसंगी  पालकमंत्र्यांनी संबंधित प्रांताधिकारी, तहसिलदार यांच्याशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला.

 दोषींवर पोलीस विभागामार्फत कारवाई करणार

जिल्ह्यात उमेद अभियानाचे समाधानकारक काम आहे परंतू काही बचत गटांच्या व्यवहारांमध्ये आर्थिक अनियमितता आढळून आली आहे. यामध्ये जे दोषी आहेत यांच्यावर पोलीस प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) चा आढावा त्यांनी घेतला यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकाही शुभांगी साठे. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रकल्प संचालिका (DRDA) नंदिनी घाणेकर आदी उपस्थित होते.  जिल्ह्यात उमेद अभियानामध्ये कितीजण कार्यरत आहेत अशी विचारणा पालकमंत्र्यांनी यावेळी केली. तसेच या सर्वाचे मानधन वाढविण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगितले त्यांनी सांगितले.

राज्यात सन 2012 मध्ये हे अभियान सूरू करण्यात आले असून रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १५ हजार ७०९ बचत गट कार्यरत असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका श्रीमती घाणेकर यांनी दिली. याप्रसंगी जिल्ह्यातील विविध महिला बचत गटांच्या प्रमुखांसह जिल्हा परिषदेचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

 विविध विकासकामांचा आढावा

पालकमंत्री उदय सामंत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विविध विकासकामांचा आढावा घेतला.

जिल्ह्यातील वाटद व पावस जिल्हा परिषद गटांच्या विकासकामांचा आढावा घेताना पालकमंत्री म्हणाले, पावसाळ्यानंतर जिल्ह्यातील सर्व विकासकामे सुरु करण्यात यावीत तसेच अपूर्ण पाणी पुरवठा योजना संबंधित यंत्रणेने लवकरात लवकर सुरु करण्याला प्राधान्य द्यावे. या जिल्हा परिषद गटातील विकासकामे करताना संबंधित यंत्रणेने, अधिकाऱ्यांनी त्या गावातील सरपंचांना कल्पना द्यावी व समन्वयातून विकासकामे पार पाडावी, अशी सूचना करुन या जि.प. गटातील रस्त्याची जी कामे अपूर्ण आहेत ती डिसेंबर महिन्यापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

श्री. सामंत यांनी यावेळी अपूर्ण व खराब रस्ते, प्रस्तावित नळपाणी योजना, शाळा कम्पाऊंड, दलित वस्ती सुधारणा, समाज मंदिर पेवर ब्लॉक बसविणे, अपूर्ण नळपाणी पुरवठा योजना तसेच प्रस्तावित कामे आदींबाबत संबंधित यंत्रणेकडून आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे,  निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अमोल ओटवणेकर, गटविकास अधिकारी जे.पी. जाधव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे शाखा अभियंता सावंत देसाई यांच्यासह संबंधित गावाचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.

——