मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे काम ऑक्टोबरअखेर पूर्ण करा -पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

        सांगली दि. 2 (जि.मा.का.) : मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे काम ऑक्टोबर अख्रेर पर्यंत पूर्ण करा. या रस्त्यावरील ड्रेनेजचे काम 30 जूनच्या आत पूर्ण करा. त्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा. काम करताना हलगर्जीपणा होत असल्यास बीले देण्याचे यंत्रणांनी घाई करू नये, असे निर्देश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी ‍दिले.

            मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या कामकाजाचा पालकमंत्री डॉ. खाडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीत आढावा घेतला. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील, मिरज उपविभागीय अधिकारी श्री. दिघे, महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील, राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूरचे प्रोजेक्ट डायरेक्टर वसंत पंढरकर, राष्ट्रीय महामार्गचे सी. बी. भरडे,  सार्वजनिक बांधकाम  विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. मिरजकर यांच्यासह राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, एमएसईबी व एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

            मिरज शहरातून जाणारा छत्रपती शिवाजी महाराज रस्ता महत्वाचा आहे. या रस्त्याचे काम जलदगतीने होवून तो पूर्ण होणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे त्यातील काही ठिकाणी महापालिकेने खोल खुदाई केल्याचे राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेने बैठकीत निदर्शनात आणून दिले असता  रस्ता खुदाई बाबत पालकमंत्री डॉ. खाडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालकेने रस्ता खुदाई का केली याचे स्पष्टीकरण द्यावे व खुदाई केलेल्या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जानुसार पूर्ण करून द्यावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

            या रस्त्यामध्ये येणारे विजेचे खांब राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेने त्वरित काढावेत.  या रस्त्याच्या कामात १९३ पोलचे स्थलांतर करण्यात येणार आहे. विद्युत वितरण कंपनी यासाठी वेळोवेळी सहकार्य करीत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेने या कामास प्राधान्य द्यावे. या रस्त्याच्या कामामध्ये एस. टी. महामंडळाकडील रस्त्यालगतीची भिंत तसेच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची भिंत अडथळा ठरत असून 12 जून पर्यंत हा अडथळा यंत्रणेने दूर करावा. महानगरपालिकेने रस्त्याच्या कामात अतिक्रमण ठरत असलेल्या अन्य इमारतींचेही अतिक्रमण काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या गटारीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे. गटारीच्या पाण्यामुळे या भागातील नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिल्या.