सुलोचना दीदींच्या निधनाने सिनेसृष्टीसह महाराष्ट्राची मोठी हानी – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना

मुंबई, दि. ४ : पद्मश्री तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित सिने सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सुलोचना लाटकर (दीदी) यांच्या निधनाने सिने सृष्टीतील ज्येष्ठ आणि मृदू स्वभावी नामवंत अभिनेत्री गमावल्याचे  दुखः आहे, अशी शोक संवेदना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

सत्तर वर्षांची प्रदीर्घ यशस्वी कारकीर्द असलेल्या सुलोचना दीदी यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी मुंबई येथे अखेरचा श्वास घेतला. मराठी व हिंदी अशा ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय करून प्रेक्षकांना अभिनयाची भुरळ घालणाऱ्या सुलोचना दीदींनी या क्षेत्रात स्वतःच्या मृदू स्वभावातून आदर्श निर्माण केला.

हिंदी चित्रपट सृष्टीत १९४३ मध्ये सहकलाकार म्हणून पदार्पण करणाऱ्या दीदीचे वैशिष्ट्य म्हणजे एका परिवारातील तीन पिढ्यांसोबत त्यांनी काम केले. शांत, सोज्वळ आणि नम्र अभिनेत्री म्हणून त्या कायम सर्वांसाठी आदरणीय होत्या व कायम स्मरणात राहतील.

अडीचशे हून अधिक मराठी तसेच हिंदी चित्रपटांत त्यांनी आपल्या अभियानाची छाप पाडली. त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टी व महाराष्ट्राची अपरिमित हानी झाली आहे. सुलोचना दीदी यांना ईश्वर सद्गती देवो अशी प्रार्थना करुन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली.

0000