राज्य शासनाने धनगर समाजासाठी लागू केलेल्या योजना व सुविधांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा – पालकमंत्री दीपक केसरकर

0
9

कोल्हापूर, दि. 4 (जिमाका):- राज्य शासनाने धनगर समाजाचे काही प्रश्न मार्गी लावलेले आहेत. त्यापैकी धनगर समाजातील नागरिकांना अनुसूचित जमाती प्रमाणे विविध शासकीय योजना व सुविधांचा लाभ मंजूर केलेला असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत या योजना पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देण्याचे आवाहन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

       पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवीच्या कार्याचा आढावा सादर करणाऱ्या मिरवणुकीचा उद्घाटन समारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मिरजकर टिकटी येथून करण्यात आला, याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे व धनगर समाजाचे मान्यवर उपस्थित होते.

        पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले की, राज्य शासनाने धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधील योजना लागू केलेले आहेत त्या योजना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवून समाजातील सर्वसामान्य नागरिकाला त्याचा लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी काही अडचणी निर्माण होत असतील तर त्या दूर करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

       पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राजकारभाराविषयी व सामाजिक व धार्मिक कार्याविषयी पालकमंत्री श्री. केसरकर यांनी माहिती दिली. तसेच अहिल्यादेवींचा सर्वसामान्य जनतेसाठी केलेला राज्य कारभार हा संपूर्ण देशभरात आदर्शवत असाच होता. त्याप्रमाणे अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

         प्रारंभी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मिरवणूक रथातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्याचा आढावा सादर करण्याऱ्या मिरणुकीचे उद्घाटनही संपन्न झाले. समाजातील पदाधिकाऱ्यांनी धनगर समाजातील विविध मागण्यांचे निवेदन सादर तुमच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात, अशी मागणी केली. तसेच राज्य शासनाने अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर केल्याबद्दल राज्य शासनाचे आभारही मानले.

      पालकमंत्री श्री. केसरकर व मान्यवर यंनी स्वतः धनगरी ढोल वाजवून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती सादर करणाऱ्या मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here