पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा देण्यासोबत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्या – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
7

पुणे,दि.8 : पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी भाविकांना पालखी मार्ग, पालखी तळ, विसावा आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यासोबत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे,  वारकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज प्रशासनाला दिले.

आगामी आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री श्री.विखे पाटील यांनी सासवड, जेजुरी आणि वाल्हे येथील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी थांबा आणि निरा येथील पालखी तळाला भेट देऊन प्रशासनाने वारकऱ्यांसाठी केलेल्या सुविधांची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत आमदार संजय जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे, उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला उपस्थित होते.

वडकी येथील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन पुणे ते पंढरपूर आषाढी वारी पालखी मार्ग पाहणी दौऱ्याला श्री.विखे पाटील यांनी सुरुवात केली. यावर्षी पालखी प्रस्थान लवकर होणार असल्याने वारकऱ्यांना उन्हाचा त्रास होऊ शकतो. यासाठी पुरेसा औषधांचा साठा, पिण्याच्या पाण्याचे अधिकाधिक टँकर, पाण्याच्या स्रोतांची, पाण्याची वेळोवेळी तपासणी करावी, रुग्णवाहिकांची संख्या वाढविणे, याचबरोबर आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व आरोग्य पथके, यंत्रणा सज्ज ठेवाव्यात अशा सूचना त्यांनी केल्या.

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे याची खात्री करावी. नियोजन करताना प्रत्येक दिंडीतील वारकऱ्यांची संख्या विचारात घ्यावी, पालख्यांच्या प्रस्थानापूर्वीच वारीसाठीची सर्व सज्जता ठेवावी, त्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक करावी आणि प्रशासकीय यंत्रणेने समन्वयाने कार्य करावे अशा सूचना श्री.विखे पाटील यांनी केल्या.

विभागीय आयुक्त श्री.सौरभ राव यांनी पालखी मार्ग तसेच वारीच्यादृष्टीने करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. यावर्षी वारीकरिता अधिकच्या मनुष्यबळाची नेमणूक करण्यात आली असून पाण्याकरिता टँकर्सची संख्याही दुप्पट करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.  जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी जिल्ह्यात करण्यात आलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली. यावेळी विविध विभागांचे जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

झेंडेवाडी प्रथमोपचार केंद्राची महसूल मंत्र्यांनी केली पाहणी

दिवे घाटातून जाणाऱ्या पालखी मार्गात वारकरी मंडळींना आवश्यक असलेल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यादृष्टीने ग्रामपंचायत झेंडेवाडी यांच्यावतीने उभारण्यात आलेल्या प्रथमोपचार केंद्राची पाहणी महसूल मंत्री श्री.विखे पाटील यांनी केली. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वय ठेवून आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवावी अशी सूचना त्यांनी केली.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here