राज्यात आणखी ४ जण कोरोना बाधित रुग्ण आढळले; राज्यातील एकूण रुग्ण संख्या ५२ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई,दि. २०: राज्यात कोरोनाचे आज दिवसभरात एकूण ४ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५२ झाली आहे. या ४ रुग्णांपैकी मुंबई येथील २ तर पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे प्रत्येकी एक रुग्ण आहे. सध्या रुग्णालयात भरती असलेल्या कोरोना बाधित रुग्णांपैकी ४१ जणांना कोणतीही लक्षणे नाहीत तर ८ जणांना सौम्य लक्षणे आहेत. मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात भरती असलेल्या दोघांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान,राज्यातील काही कोरोनाबाधीत रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत असून अशा रुग्णांचा १४ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुन्हा चाचणी केली जाईल. त्यात त्यांचे नमुने निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्याबाबत निर्णय घेतला जाईल,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

मुंबई येथे आज आढळून आलेल्या दोन रुग्णांमध्ये एका ३८ वर्षीय तरुणाने तुर्कस्थान येथे प्रवास केला असून ६२ वर्षीय व्यक्तीने (पुरुष) इंग्लंड येथे प्रवास केलेला आहे. तर पुण्यातील २० वर्षीय तरुणाने स्कॉटलंड येथून प्रवास केलेला आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील फिलीपाईन्स आणि सिंगापूर येथे जाऊन आलेला जो २२ वर्षीय तरुण दोन दिवसांपूर्वी कोरोना बाधित आढळला.त्याचा २४ वर्षाचा भाऊ आज कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील असा:-

     पिंपरी चिंचवड मनपा – १२ (दि. २० मार्च रोजी १ रुग्ण आढळून आला)

     पुणे मनपा       – ९   (दि. २० मार्च रोजी १ रुग्ण आढळून आला)

     मुंबई –     ११  (दि. २० मार्च रोजी १ रुग्ण आढळून आला)

     नागपूर – ४    

     यवतमाळ,नवी मुंबई,कल्याण प्रत्येकी -३ 

     अहमदनगर-      

     रायगड,ठाणे,उल्हासनगर,औरंगाबाद,रत्नागिरी प्रत्येकी-१

एकूण  ५२ (मुंबईमध्ये एक मृत्यू) 

राज्यात आज परदेशातून आलेले एकूण २८१ प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत. आतापर्यंत बाधित भागातून एकुण १५८६ प्रवासी आले आहेत.

दिनांक १८ जानेवारी पासून ताप,सर्दी,खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत १३१७ जणांना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी १०३५ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत,तर ५२ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत.

राज्य नियंत्रण कक्ष क्रमांक : ०२०/२६१२७३९४ 

टोल फ्री  क्रमांक १०४

०००००

अजय जाधव..20.3.2020