मुंबई दि ९ :- राज्यातील स्वयंसेवी संस्थांद्वारा संचलित अनुदानित आश्रमशाळांच्या विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मेघदूत निवासस्थान येथे स्वयंसेवी संस्थांद्वारा संचलित अनुदानित आश्रमशाळांबाबत बैठक झाली. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीपकुमार व्यास, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, विद्यार्थ्यांचे परिपोषण अनुदान वाढवणे तसेच आकस्मिक व सानुग्रह अनुदान यासंदर्भातील स्वयंसेवी संस्थांद्वारा संचलित अनुदानित आश्रमशाळांच्या विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करण्यात येत असून या मागण्यांबाबत सर्व संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचे परिपोषण अनुदान, आकस्मिक अनुदान, सानुग्रह अनुदान व वेतनश्रेणी यासंदर्भातील विविध मागण्या संघटनेच्या वतीने यावेळी मांडण्यात आल्या.
—-000—-