श्री कुंथूगिरी क्षेत्राच्या विकासासाठी नियोजन समितीतून एक कोटीचा निधी देणार -पालकमंत्री दीपक केसरकर

0
9

कोल्हापूर, दि. ११ (जिमाका): श्री क्षेत्र कुंथुगिरी हे शांततेचा संदेश देणारे क्षेत्र आहे. या क्षेत्राचा विकास कुंथूसागर महाराजांच्या विशेष प्रयत्नातून झालेला आहे. या परिसराचा अधिक चांगला विकास व्हावा व भाविकांसाठी अधिक पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून जिल्हा नियोजन समितीतून या क्षेत्राच्या विकासासाठी एक कोटीचा निधी देणार असल्याची ग्वाही शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

 

आळते (ता. हातकणंगले) येथील श्री कुंथूगिरी क्षेत्रावर श्री गणाधिपती गणधराचार्य कुंथूसागर विद्या शोध संस्थेच्यावतीने श्री कुंथूसागर महाराज यांचा जगद्गुरु वर्ष वर्धन महोत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री श्री. केसरकर बोलत होते. यावेळी खासदार धैर्यशिल माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार सर्वश्री कल्लाप्पाण्णा आवाडे, राजू शेट्टी, कोषाध्यक्ष हिरालाल गांधी, माजी आमदार सुजित मिणचेकर, आळतेचे सरपंच अजिंक्य इंगवले, उपसरपंच अमित पाटील यांच्यासह अन्य मान्यवर जैन धर्मीय लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. केसरकर पुढे म्हणाले की, जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या जैन धर्मियांचे राज्याच्या विकासात ही मोठे योगदान दिलेले आहे. या क्षेत्राचा विकास झाला पाहिजे यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एक कोटी रुपये निधी देण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच या परिसराच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करूया असे आवाहन ही त्यांनी केले.

गणाधिपती कुंथूसागर महाराजांच्या जन्मदिनानिमित्त सर्व जैन बांधवांना शुभेच्छा देऊन श्री कुंथूगिरी क्षेत्राच्या विकासासाठी आणखी निधी उपलब्ध करुन देण्यार असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संजय शिरसाट यांनी गणाधिपती कुंथूसागर महाराजांचे या खडकाळ डोंगरावर मंदिर बांधण्याचे स्वप्न होते ते पूर्ण झाले असून मंदिराकडे जाण्यासाठी रस्त्याचे काम अपुरे राहिलेले आहे त्या कामासाठी पालकमंत्री महोदयांनी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.

ज्या गावात तीर्थक्षेत्र विकसित केले त्या आळते गावाचा विकास करण्याचे कामही कुंथूसागर महाराजांनी केल्याबद्दल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महाराजांच्या कार्याचा गौरव केला.

प्रारंभी पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गणाधिपती कुंथूसागर महाराज अन्नछत्राचा शिलान्यास समारोह संपन्न झाला.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here