बीड, दि. १६ :- राज्याचे सहकार व इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जिल्हा पोलीस दलास १० नवीन चारचाकी वाहनांचे आज लोकार्पण करण्यात आले.
बीड पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री श्री सावे यांच्या उपस्थितीत या वाहनांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे , जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी आदित्य जीवने , जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. सुधाकर चिंचाने, पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यासह राजेंद्र मस्के, सलीम जहांगीर, देविदास नागरगोजे , शासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री श्री. सावे यांना नवीन वाहनांच्या ताफ्याने संचालनाद्वारे मानवंदना दिली. तसेच त्यांच्या हस्ते नवीन वाहनांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला. सदर 10 वाहनांसाठी जिल्हा नियोजन समितीतून 90 लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आले असून जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था राखताना पोलीस विभागाला सक्षम करण्यासाठी नवीन वाहनांच्या माध्यमातून बळकट केले जात आहे. कार्यक्रमानंतर पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ मुंडे व जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. ठाकूर यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार व इतर अधिकारी, पदाधिकारी व पत्रकारांशी संवाद साधला.