पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही- पालकमंत्री संजय राठोड

0
10

           यवतमाळ,दि.१६ (जिमाका) :- जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चांगल्या वाहनांची गरज लागते. या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने माझ्या जिल्ह्याच्या पोलीस दलाचे बळकटीकरण करणे माझे प्रथम कर्तव्य आहे. म्हणूनच जिल्हा नियोजन समितीमधून आज पोलीस दलाला २९ वाहने उपलब्ध करून दिली आहेत. आपल्या जिल्ह्याच्या पोलीस दलाचे बळकटीकरणासाठी आवश्यक ती सर्व मदत करायला तयार असल्याची ग्वाही अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.

            आज पोलीस मुख्यालयात यवतमाळ जिल्हा पोलीस विभागासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या नऊ चार चाकी वाहने,दहा टी.व्ही.एस.मोपेड तर दहा हिरो मोटर सायकल अशा एकोणतीस गस्ती वाहनांचे हस्तांतरण पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी आमदार मदन येयेरावर,जिल्हा पोलीस अधिक्षक पवनकुमार बनसोड,अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप,तसेच पोलीस विभागातील पोलीस अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री यांनी वाहनांचे पूजन करून वाहनांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

यावेळी बोलताना मंत्री श्री राठोड म्हणाले, आजही आपल्या जिल्ह्यातील काही पोलीस स्थानके ही ब्रिटिश कालीन असून, त्या पडायला आलेल्या इमारती मधुन आपली कामे चालतात, ही खेदाची बाब आहे. नविन  पोलिस इमारतींसाठी प्रस्ताव सादर करावे,लागलीच निधी प्राप्त करून देतो असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर पोलीस बांधवांच्या निवासस्थानाच्या दुरुस्तीचे कामे, सी.सी.टीव्ही.कॅमेरे किंवा ड्रोन कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही.पोलिस विभागाने दोन ड्रोनची मागणी केली होती परंतु जिल्ह्याला पाच ड्रोनची गरज आहे. पाच ड्रोनचा प्रस्ताव सादर करण्यासही त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्याच्या पोलीस दलाचे बळकटीकरण करणे व काही उनिवा असल्यास त्या दूर करणे हे त्यांचे कर्तव्यच असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले.

यावेळी प्रास्ताविक करताना जिल्हा पोलीस अधिक्षक पवन बनसोड यांनी सांगितले की, जिल्हा नियोजन समिती मधून २ कोटी २८ लाख ४३ हजार निधी प्राप्त झाला असून,या  गस्ती वाहनामुळे जिल्ह्याच्या पोलीस दलाला बळकटी प्राप्त होणार आहे. तसेच डायल ११२ च्या माध्यमातून संकटकालीन वेळेत सामान्य जनतेपर्यंत पंधरा मिनिटात पोहचणे शक्य होणार आहे. तसेच पालकमंत्री महोदयांनी यासाठी निधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.  अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here