जलजीवन, स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी ‘मिशन मोड’वर करावी – मुख्य सचिव मनोज सौनिक

मुंबई, दि. 16 : महाराष्ट्र हे विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी आघाडीवर असलेले राज्य आहे. त्यामुळे जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी मिशन मोडवर करण्यावर सर्व जिल्ह्यांनी भर द्यावा. स्वच्छ भारत मिशनमध्ये महिलांचा आणि स्वयंसहायता गटांचा सहभाग घेऊन गाव ‘ओडीएफ प्लस’ करून स्वच्छ महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करावे, असे निर्देश मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी आज दिले.

राज्यामध्ये राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन व स्वच्छ भारत अभियान (ग्रा.) या कार्यक्रमांच्या जिल्ह्यांच्या प्रगतीचा आढावा दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून मुख्य सचिव श्री. सौनिक यांनी केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या सचिव विनी महाजन, सहसचिव जितेंद्र श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात घेतला. या बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, जलजीवन मिशनचे संचालक रणजित कुमार, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले,  वित्त आणि नियोजन विभागाच्या सचिव श्रीमती ए. शैला यांसह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य अभियंता आदी उपस्थित होते.

स्वच्छता मोहिमेबाबत ग्रामीण भागात राज्यस्तरीय जनजागृती मोहिम राबविण्याच्या सूचना करीत मुख्य सचिव श्री. सौनिक म्हणाले, सामान्य माणसांशी निगडीत असलेल्या स्वच्छ भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामविकास विभागाने विशेष मोहीम हाती घ्यावी. गुणवत्ता व दर्जात्मक कामे करण्यावर भर द्यावा. स्वच्छतेविषयी लोकांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. यासाठी आठवड्यातून केवळ एक दिवस नाही, तर सर्व दिवस हे स्वच्छतेसाठी द्यावे. त्याप्रमाणे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी कामाचे नियोजन करावे, अशा सूचनाही श्री सौनिक यांनी यावेळी दिल्या.

राज्यात जलजीवन मिशनमधील काही कामे  वन, रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ना – हरकतीसाठी प्रलंबित आहे. या कामांना तातडीने ना – हरकत देवून कामे पूर्ण करावी. प्रकल्प प्रलंबित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. प्रत्येक जिल्ह्यात अधिकाऱ्यांनी शाळा, अंगणवाड्या व अन्य शासकीय इमारतींच्या पाणी पुरवठ्याबाबत सर्वेक्षण करावे. जिल्ह्यातील संपूर्ण शाळा, अंगणवाडी यांना 100 टक्के पाणी पुरवठा होण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय सचिव विनी महाजन यांनी जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) ची अंमलबजावणी राज्यात प्रभावीपणे करावी. गावपातळीवर पाणी पुरवठा समित्या कार्यान्व‍ित कराव्यात. त्यासोबतच स्वयंसहायता गटांनाही सक्रिय करावे.

ग्रामसभा घेऊन गाव ओडीएफ प्लस  झाल्याचे जाहीर करावे. ओडीएफ प्लस गाव हे आदर्श गाव आहे. त्यामुळे गाव आदर्श ठेवण्याची जबाबदारी ग्रामस्थांची आहे. गावातील प्रत्येक घरात नळ जोडणी द्यावी. कुणीही स्वच्छ पाणी पुरवठ्यापासून वंचित राहू नये. यादृष्टीने योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना मुख्य सचिवांनी यावेळी दिल्या.

सहसचिव श्री. श्रीवास्तव यांनी स्वच्छ भारत अभियान (ग्रा)चा आढावा घेत गोवर्धन प्रकल्प, बायोगॅस व कचरा निर्मूलन कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना केल्या. जलजीवन मिशनचे संचालक रणजित कुमार यांनी यावेळी जल जीवन मिशनच्या कामाचा आढावा घेतला. बैठकीदरम्यान मुख्य सचिव श्री. सौनिक यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्ह्यांचा आढावा घेतला.

००००

मनीषा पिंगळे/विसंअ/