मुंबई, दि. 19 :- उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर नियामक मंडळाच्या 83 व्या बैठकीत 4199.72 कोटी रुपयांच्या 11 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सचिव आणि कार्यकारी संचालक रा. द. मोहिते, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी उपस्थित होते.
बैठकीत एकूण 73 विषय मंजूर करण्यात आले. तसेच रु. 240.02 कोटीचे १२ दायित्व प्रस्ताव मंजूर करण्यात आले. 8 सिंचन प्रकल्प सौर उर्जेवर कार्यान्वित करण्यासाठी रु. 681.68 कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. सिंचन प्रकल्पांतर्गत विविध कारणांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किंमत 3.79 कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. प्रकल्पाच्या भूसंपादन निवाड्यामधून सुटलेल्या मालमत्तांची मूल्यांकन रक्कम तसेच फळझाडे व वनझाडांचा मोबदला तसेच पुनर्वसनबाधित कुटुंबांना मोबदल्यातून सुटलेल्या, मालमत्तांचे मोबदला रक्कम १४८.४८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. असे एकूण 5273.69 कोटी रूपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
—-000—–