सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : निरोगी राहण्यासाठी आणि दीर्घायुष्य मिळवण्यासाठी सर्वांनी नियमितपणे योग करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली, पतंजली योग समिती आणि केंद्रीय सूचना ब्यूरो यांच्या सहकार्याने नव महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनि. कॉलेज, लक्ष्मी मंदीर जवळ, कुपवाड रोड, सांगली येथील मैदानावर आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यामध्ये ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महानगरपालिका आयुक्त सुनिल पवार, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, योगाभ्यासामध्ये सातत्य आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील व त्यातून आपल्याला दीर्घायुष्याचा लाभ मिळेल. यावेळी पतंजलीच्या योग साधकांनी उपस्थित सर्वांकडून योग प्रोटोकॉल म्हणजे विशिष्ट योगाभ्यास करून घेतला. केंद्रीय संचार ब्यूरोच्या कोल्हापूर कार्यालयाने आयोजित केलेल्या योग विषयक स्पर्धांच्या विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली तसेच केंद्रीय संचार ब्यूरोने यावेळी प्लास्टिक टाळा पर्यावरण वाचवा आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व या गोष्टी मांडणाऱ्या कापडी पिशव्यांचे वितरण केले.
दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय योग दिन हा एक महत्त्वाचा उत्सव आहे, यामुळे जगभरात योगाभ्यास आणि त्याच्या लाभांविषयी जनजागृती होत आहे. योग, त्याच्या एकता आणि परस्परांशी जोडले जाण्याच्या मूलभूत तत्त्वांसह, “वसुधैव कुटुंबकम” या संकल्पनेचे मूर्त स्वरूप आहे. योगाच्या सरावाद्वारे, व्यक्ती इतरांशी आणि जगाशी असलेले त्यांचे संबंध ओळखून त्यांच्या अंतर्मनात प्रवेश करतात. योग सर्व प्राणी आणि पर्यावरणाप्रती सहानुभूती, करुणा आणि जबाबदारीची भावना प्रोत्साहित करतो. त्यामुळे यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची योग फॉर वसुधैव कुटुंबकम अशी संकल्पना आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनामुळे वसुधैव कुटुंबकमची तत्त्वे स्वीकारण्याची आणि जागतिक सलोख्यासाठी काम करण्याची प्रेरणा मिळते.
00000