दोन वर्षात राज्यातील सर्व आश्रमशाळा, वसतीगृहांना स्वमालकीच्या इमारती – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

0
9

नंदुरबार, दि. २२ (जिमाका): येत्या दोन वर्षांत राज्यातील सर्व आश्रमशाळा तसेच वसतीगृहांचे बांधकाम पूर्ण करून त्यांना स्वमालकीच्या इमारती असतील, असा विश्वास आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला.

नंदुरबार तालुक्यातील भालेर, वाघाळे, येथील शासकीय मुला-मुलींच्या नूतन वसतीगृह/ आश्रमशाळांच्या इमारतीच्या उद्धटानप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, राजश्री गावित, सरपंच सरिता वळवी (लोय), सोनाली वळवी, (भवानीपाडा), उपसरपंच अमन पाडवी, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मीनल करनवाल, सार्वजनिक बांधकाम विभाग (आदिवासी विकास) उपअभियंता ए.पी.चौधरी,  सहायक प्रकल्प अधिकारी संजय काकडे, के.एस.मोरे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री डॉ.गावित म्हणाले की, नजीकच्या काळात शासनाने आदिवासी विकास विभागाला बऱ्याच ठिकाणी नवीन आश्रमशाळा व वसतीगृहांच्या नवीन इमारती बांधण्यास निधी दिला आहे. राज्यात ज्या ठिकाणी शासकीय आश्रमशाळा व वसतीगृहाच्या नवीन इमारती नाहीत अशा ठिकाणी येत्या दोन वर्षांत बांधकाम पूर्ण करण्याचा शासनाचा विचार आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, चांगल्या पदावर नोकरी मिळावी या त्याचा मागचा हेतू आहे. यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर्षी ५६ नवीन इमारती बांधण्यास मंजूरी दिली त्यात नंदुरबार जिल्ह्यात  सर्वाधिक आश्रमशाळा, वसतीगृहाचा समावेश आहे. या सर्व इमारतींचे बांधकाम लवकरच सुरु होवून त्या लवकरच पूर्ण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आश्रमशाळेतील विद्यार्थी हे इतर समाजातील विद्यार्थ्यांबरोबर स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी येत्या काळात राज्यात करिअर ॲकॅडमी काढण्याचे नियोजन असून येथे नियमित शिक्षणाबरोबर स्पर्धा परीक्षेचे शिक्षण देण्यात येईल. सुविधा मिळत नाही म्हणून विद्यार्थी मागे पडला हे  घडता कामा नये यासाठी शिक्षणासाठी ज्या – ज्या आवश्यक सुविधा लागतील त्या सर्व उपलब्ध करुन देण्यात येतील. यासाठी आदिवासी विकास विभागातून आवश्यक ती निधीची तरतूद करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

यावर्षापासून प्रत्येक आश्रमशाळेत वॉशिंग मशीन देण्यात येईल. येत्या दोन वर्षांत आश्रमशाळांच्या ठिकाणी शिक्षक, कर्मचारी यांचे निवासस्थान  बांधण्याचे नियोजन आहे. जेणे करुन आश्रमशाळा ही जी संकल्पना आहे ती यशस्वी पणे पार पाडता येईल. प्रत्येक आश्रमशाळेचा निकाल १०० टक्के लागावा यासाठी राज्यातील सर्व आश्रमशाळेत एकाच पद्धतीने अभ्यासक्रम शिकविले जाणार असून सर्व विद्यार्थ्यांची दोन तीन महिन्यांनी परीक्षा तसेच शिक्षकांच्याही परीक्षा घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here