ऊसतोड कामगारांच्या भल्यासाठी ‘गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ’

राज्यातील प्रमुख उद्योगांपैकी एक उद्योग असणा-या साखर उद्योग क्षेत्रात ऊसतोडणीचे काम करणारे बहुतांश कामगार हे मराठवाडा विभागातील आहेत. ऊसतोडणीच्या ऐन हंगामात विविध गाव- तांड्यावरून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते. या हंगामी स्थलांतरामुळे त्यांच्या कुटुंबीयाना अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होतात आणि ते तितकेच भेडसावतातही. त्यांच्या या स्थलांतरामुळे वृद्धांच्या दैनंदिन आरोग्याची काळजी घेणे, ज्येष्ठ आजारी नागरिकांना वेळेत उपचारासाठी रुग्णालयात नेणे, लहान मुलांची शाळेतील अनुपस्थिती वाढणे, शालेय किशोरवयीन मुलींची काळजी घेणे किंवा मग अनिच्छेने का होईना त्यांचा विवाह करणे, त्यांच्या घरे, पाळीव जनावरे, प्राण्यांच्या देखभाल करणे यासह ऊसतोड कामगाराची गरोदर पत्नी असल्यास एकतर तिची काळजी घेण्यासाठी घरी थांबणे किंवा मग तिला सोबत ठेवण्याशिवाय दुसरा पर्यायच त्या ऊसतोड कामगाराकडे राहत नाहीत. यासह इतर अनेक समस्यांना या कामगारांना तोंड द्यावे लागते.

या व्यवसायातील कामगारांना महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघाच्या स्तरावरून दरवर्षी होणाऱ्या सामंजस्य करारानुसार मजुरी व अन्य लाभ देण्यात येत असले तरी ऊसतोड कामगारांना भविष्य निर्वाह निधी, कामगार राज्य विमा योजना, उपदान, नुकसान भरपाई, सानुग्रह अनुदान इ. सामाजिक सुरक्षितता योजनांचे लाभ देण्याची आवश्यकता आहे. तसेच त्यांच्या पाल्यांना विशेष अशा शैक्षणिक सुविधा पुरविणे देखील आवश्यक आहे. या सर्व बाबींचा विचार करून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देणे तसेच स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे सुरु आहे. यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली असून, या महामंडळाच्या माध्यमातून त्यांना ओळखपत्र देण्याचे काम गतीने सुरु आहे.

आतापर्यंत उपेक्षित असलेल्या ऊसतोड कामगारांची नोंदणी करून ओळखपत्र देण्यात करण्यात आलेल्या योजनेत परभणी जिल्ह्यात जिल्हाधिकारी आंचल गोयल व तत्कालिन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात ऊसतोड कामगारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे.

परभणी जिल्ह्यातील ऊसतोड कामगार १८ हजार ११३ असून, ते व त्यांचे कुटुंबीय अस्थिर व हलाखीचे जीवन जगत आहेत. या ऊसतोड कामगारांच्या राहणीमानात बदल होण्यासाठी विविध सामाजिक व आरोग्यविषयक कल्याणकारी योजना राज्य शासनाने सुरु केल्या आहेत. राज्य शासनाकडून गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची १३ सप्टेंबर २०१९ रोजी स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळाच्या माध्यमातून ४ ऑगस्ट २०२१ च्या शासन निर्णयानुसार ऊसतोड कामगारांना स्थिर व सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी शासनाकडून ठोस पावले उचलण्यात येत आहेत.  वास्तव्यास असलेल्या ठिकाणी व सतत मागील तीन वर्षांपासून ऊसतोड कामगार असणाऱ्यांना ग्रामसेवकाने ओळखपत्र देणे अपेक्षित आहे. हे काम वेळेत पूर्ण व्हावे, कामात सुलभता यावी तसेच स्थानिक पातळीवर काही समस्या उद्भवल्यास तातडीने निराकरण करता यावे, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे.

लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कामास गती देण्यासाठी महामंडळाचे मुख्यालय पुणे येथे ३ एप्रिल २०२२ रोजी सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत उपेक्षित असलेल्या ऊसतोड कामगारांची नोंदणी करून ओळखपत्र देण्यात येत आहे. या ओळखपत्राच्या माध्यमातून त्यांना शासकीय पातळीवर स्वतंत्र ओळख मिळवून देण्यात येत आहे. भविष्यात ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटूंबीयांसाठी विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामध्ये घरकुल, वैद्यकीय सुविधा, ऊसतोड करतेवेळी होणारे अपघात लक्षात घेता, भविष्यासाठी राज्य विमा योजना, त्यांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना, कौशल्य विकास योजना, कमी व्याजदराने भांडवली कर्ज योजना, ऊसतोड वाहक व चालकांसाठी विमा योजना, स्वस्त धान्य योजना, अंगणवाडी शाळा इ. योजना राबविण्यात येत आहेत.

जिल्ह्यात ७ साखर कारखाने कार्यरत असून, त्यामध्ये ऊसतोड कामगार म्हणून नोंदणी झालेल्यांची संख्या ही १८ हजार ११३ एवढी आहे.  यामध्ये श्री. रेणुका शुगर लिमिटेड, देवनांद्रा ता. पाथरी येथे १ हजार ६५५, श्री. लक्ष्मी नृसिंह शुगर एल.एल. पी. अमडापूर ता. जि.परभणी. येथील कारखान्यात ६७२, योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड, लिंबा ता. पाथरी  येथे ४ हजार २८९, गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड, माखणी ता. गंगाखेड येथे ५ हजार ११९, बळीराजा साखर कारखाना लिमिटेड, कानडखेड ता. पूर्णा येथे ७२०, ट्वेंटी वन शुगर लिमिटेड, देवीनगर तांडा, सायखेडा, ता. सोनपेठ येथे ५ हजार २०८ आणि श्री. तुळजाभवानी शुगर प्रा.लि. आडगाव (दराडे), ता. सेलू येथे ४५० असे एकूण १८ हजार ११३ ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे.

आतापर्यंत या योजनेंतर्गत ५ हजार ६४८ ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देण्यात आले असून, त्यांची तालुकानिहाय आकडेवारी ही पुढीलप्रमाणे आहे. परभणी ४२४, जिंतूर ३९२, गंगाखेड ९७५, सेलू १६५, मानवत ६५८, पाथरी २ हजार २६१, पालम १९२, पुर्णा ४१२ आणि सोनपेठ तालुक्यात १६९ कामगारांना ओळखपत्राचे वितरण करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक ओळखपत्राचे वितरण हे पाथरी तालुक्यात झाले असून, सर्वात कमी ओळखपत्र सेलू तालुक्यात वितरीत करण्यात आले आहेत.

 ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटूंबीयांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

परभणीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांनी दिनांक ०६ जून २०२३ अखेर माहे मे – २०२३ मध्ये परभणी जिल्ह्यात एकूण ९०० ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटूंबीयांची आरोग्य तपासणी केली आहे. या आरोग्य तपासणीत १३ गर्भवती ऊसतोड कामगार होत्या. त्या सर्व महिलांची प्रसूती झाल्यानंतर त्यांना व नवजात बालकांचे लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत नियमित सुरु आहे.

ऊसतोड कामगार असलेल्या सर्जेराव तोडके या लाभार्थ्याचा अभिप्राय

सर्जेराव पाराजी तोडके, रा. तुरा पो. रामपुरी ता. पाथरी जि. परभणी येथील रहिवासी असलेले ऊसतोड कामगार यांना ऊसतोड कामगार ओळखपत्र वितरीत केले आहे. जवळपास दहा वर्षांपासून विविध साखर कारखान्यात ऊसतोडणीचे काम करतो. मागील तीन ते चार वर्षांपासून गंगाखेड शुगर लि. विजयनगर, माखनी येथे सलग काम करीत आहे. त्यामुळे समाजकल्याण विभागाचे कर्मचारी माझ्या (तुरा) गावचे ग्रामसेवक यांनी प्रत्यक्ष माझ्याशी संपर्क साधून माझे आधारकार्ड, फोटो, रेशनकार्ड, बँक पासबुक ही कागदपत्रे जमा करून मला ‘ऊसतोड कामगार ओळखपत्र’ प्रमाणपत्र दिले आहे. यापूर्वी कोणत्याही शासकीय यंत्रणेने ऊसतोड कामगारांना संपर्क केलेला नसून यावर्षीच पहिल्यांदाच समाजकल्याण विभाग आणि ग्रामपंचायत विभागाच्या कर्मचारी व अधिकारी यांनी मला व माझ्या काही सहकारी ऊसतोड कामगारांना समाजकल्याण विभागाच्या वर्धापनदिन निमित्त दि. १५ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या कार्यक्रमास बोलावून सत्कार केलेला आहे. तसेच येणाऱ्या काळात लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामार्फत माझ्या मुला-मुलींसाठी व एकूणच कुटुंबासाठी शासकीय वसतिगृह, घरकुल योजना, मुलींच्या विवाहासाठी आर्थिक सहाय्य, आरोग्य विषयक सुविधा, विमा योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. याबद्दल तसेच मला शासकीय कार्यालयामार्फत ‘ऊसतोड कामगार ओळखपत्र’ मिळवून दिल्याबाबत मी समाजकल्याण कार्यालय परभणी  आणि ग्रामपंचायत कार्यालय तुरा यांचा मनापासून आभारी आहे.’

 

  • प्रभाकर बारहाते,

     माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, परभणी