कोराडीतील सांस्कृतिक केंद्रात रामायण आणि स्वातंत्र्यलढ्याची मिळणार सचित्र माहिती; राष्ट्रपतींच्या हस्ते उद्या लोकार्पण

नागपूर, दि. 4 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या 5 जुलै रोजी दुपारी कोराडीतील भारतीय विद्या भवनतर्फे निर्मित सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण होणार आहे. रामायण आणि स्वातंत्र्यलढ्याची सचित्र माहिती या केंद्रात दर्शकांना मिळणार आहे.

लोकार्पण कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार कृपाल तुमाने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कोराडी येथे भारतीय विद्या भवनातर्फे रामायण सांस्कृतिक केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या रामायण सांस्कृतिक केंद्राच्या पहिल्या माळ्यावरील दालनात चित्र स्वरूपात रामायणाची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. तर दुसऱ्या माळ्यावरील दालनात १८५७ ते १९४७ या काळातील स्वातंत्र्यवीरांची शौर्यगाथा सचित्र मांडण्यात आली आहे. तीन एकर जागेवर दक्षिण भारतीय शैलीत हे केंद्र तयार करण्यात आले आहे.परमवीर चक्र प्राप्त २० सैनिकांची माहितीही या दालनात देण्यात आली आहे.

दुमजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर महाकाव्य रामायणातील प्रसंग विविध चित्रांच्या स्वरूपात मांडलेले आहेत. चित्रांमधील घटना आणि व्यक्तिमत्त्वे समजून घेण्यासाठी येथे हिंदी, इंग्रजी आणि मराठीत माहिती देण्यात आली आहे. आतील सजावट ही राजवाड्यासारखीच असून, रंगसंगती, ध्वनी व्यवस्था आणि प्रकाश योजना त्याच पद्धतीने करण्यात आली आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर, भारतीय स्वातंत्र्यातील क्रांतिकारकांच्या योगदानावर आधारित चित्र गॅलरी तयार करण्यात आली आहे.

असा असेल दौरा कार्यक्रम –

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज सायंकाळी वायुसेनेच्या विशेष विमानाने आगमन झाले असून राजभवन येथे राखीव. दि. 5 जुलै रोजी सकाळी हेलिकॉप्टरने गडचिरोलीकडे रवाना होतील. सकाळी 10.30 वाजता गडचिरोलीत गोंडवाना विद्यापीठाची प्रशासकीय इमारत व परीक्षा भवनाचा शिलान्यास तसेच विद्यापीठाच्या 12 व्या दीक्षांत समारंभात सहभागी होतील. सायंकाळी 5 वाजता कोराडी येथील भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन त्या करणार आहेत. दि. 6 जुलै रोजी सकाळी 8.45 ते 9.25 आदिवासी समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा राजभवनात करतील.  10.15 वाजता विमानतळावरून मुंबईला रवाना होतील.

                                                            *******