शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यास मान्यता – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
4

मुंबई, दि. 5 : अहमदनगर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे. सद्य:स्थितीत जिल्हास्तरीय महसूल विभागाशी निगडित सर्व कामकाजांसाठी नागरिकांना जिल्हा मुख्यालयी जावे लागते. नागरिकांची सोय विचारात घेता, तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यास व या कार्यालयासाठी 13 जून 2023 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीतील मान्यतेनुसार सहा पदे नियमित वेतनश्रेणीवर मंजूर करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. ही पदे सध्याच्या त्या-त्या संवर्गाचा एक भाग राहतील. यामध्ये एक अपर जिल्हाधिकारी, एक नायब तहसीलदार, एक लघुलेखक, एक अव्वल कारकून, दोन लिपिक- टंकलेखक, अशी पदे असणार आहेत. अहमदनगर अपर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यक्षेत्रात नेवासा, शेवगाव, पाथर्डी, अहमदनगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड असे आठ तालुके राहतील. अपर जिल्हाधिकारी, शिर्डी, यांच्या कार्यक्षेत्रात कोपरगाव, राहता, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले, राहुरी असे एकूण सहा तालुके राहतील.

अहमदनगर जिल्ह्यातील अपर जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर तसेच अपर जिल्हाधिकारी कार्यालय, शिर्डी यांच्या कार्यक्षेत्रातील तालुके, त्याअंतर्गत महसूल मंडळे, तलाठी साजे व त्यामध्ये अंतर्भूत होणाऱ्या गावांची यादी प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही जिल्हाधिकारी, अहमदनगर यांच्यास्तरावर करण्यात यावी.अपर जिल्हाधिकारी, शिर्डी, ता. राहाता, जि. अहमदनगर यांचे प्रतिवेदन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी, अहमदनगर आणि नियंत्रक अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक हे काम पाहतील.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/

 

Shirdi additional collector

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here