इतर मागास प्रवर्ग विद्यार्थी वसतिगृहाच्या अडचणी तातडीने दूर कराव्यात – मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. ६ : इतर मागास प्रर्वगातील विद्यार्थ्यांना प्राधान्याने वसतिगृह उपलब्ध करुन देण्यात असलेल्या अडचणी तातडीने दूर करून या कामाला अधिक गती द्यावी, असे निर्देश इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले.

सहकार व  इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री श्री. सावे यांच्या अध्यक्षतेखाली  आज विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मंत्री श्री. सावे यांनी हे निर्देश दिले. यावेळी इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे, संचालक, प्रादेशिक उपसंचालक व सर्व सहाय्यक आयुक्त संबंधित तसेच अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. सावे म्हणाले की, इतर मागास प्रर्वगातील मुला-मुलींसाठी ३६ वसतिगृहे सुरु करण्याबाबत जागा उपलब्ध होत नसेल, तर संबंधित जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि  जिल्हाधिकारी यांच्याशी समनव्य साधून यावर तातडीने मार्ग काढावा. तसेच इतर मागास प्रर्वगातील मुला-मुलींसाठी ७२ वसतिगृहे सुरु करण्यासासाठी इमारती भाड्याने घेण्यात ज्या अडचणी आहेत, त्या तातडीने दूर कराव्यात.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधारणा योजना, आश्रमशाळांच्या संच मान्यता, बंद पडलेल्या आश्रमशाळांचा आढावा, धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश देणे, धनगर समाजाच्या विकासासाठीच्या विशेष योजना, कन्यादान योजना, मॅट्रिकोत्तर व मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेच्या प्रलंबित प्रकरणांचा जिल्हानिहाय व वर्षनिहाय माहितीसह आढावा, इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या इतर योजना, याबाबत जिल्हानिहाय आढावाही मंत्री श्री. सावे यांनी या बैठकीत घेतला.

 

०००

काशीबाई थोरात/विसंअ/