पात्र गिरणी कामगारांना तातडीने घरे मिळण्यासाठी अधिकच्या घरकुलांची निर्मिती करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ७ – गिरणी कामगारांची पात्रता निश्चित करून पात्र कामगारांना घरे देण्यासाठी शासनामार्फत जे निर्णय घेणे आवश्यक असेल ते घेतले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. विविध योजनांमधून घरे उपलब्ध होत असून सर्व पात्र गिरणी कामगारांना घरे मिळण्यासाठी अधिकच्या घरकुलांची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) आणि गिरणी कामगार सनियंत्रण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवास मिल यामधील 251 पात्र गिरणी कामगारांना घरकुलांच्या चाव्या वाटप करण्यात आल्या.

या कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री सुरेश खाडे, गिरणी कामगार समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे, आमदार कालिदास कोळंबकर, प्रकाश आबिटकर, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, ‘म्हाडा’ चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, घर हे सर्वांचे स्वप्न असते. मुंबईच्या विकासात गिरणी कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. पात्र गिरणी कामगारांना घरांच्या चाव्या वाटपाचा 20 दिवसांतील हा दुसरा टप्पा असून कामाची ही गती यापुढेही कायम राहणार आहे. यापुढे देखील घर मिळण्यात विलंब होऊ नये यासाठी गिरणी कामगारांची जशी पात्रता निश्चित होईल तसे चाव्या वाटपाचे कार्यक्रम घेण्यात येतील. कामगारांना गिरण्यांच्या जागेवरच घरे देण्याचा प्रयत्न असून गिरणी कामगारांचे घरांचे स्वप्न पूर्ण होत असल्याने कामगारांना आनंद होत आहे. त्यांच्या आनंदात शासन म्हणून आम्हालाही आनंद असल्याचे त्यांनी नमूद केले. मोदी आवास योजनेप्रमाणे विविध योजनांमधून घरे उपलब्ध होत असून या माध्यमातून मुंबईतून बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. आज चाव्या मिळालेल्या गिरणी कामगारांचे त्यांनी अभिनंदन केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सरकार गतिमानतेने काम करीत आहे. यामुळेच ‘सर्वसामान्यांचे सरकार’ अशी या सरकारची ओळख आहे. ज्यांची अंमलबजावणी शक्य आहे असेच निर्णय घेतले जात आहे. सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले जात आहेत. रखडलेले पुनर्विकासाचे प्रकल्प मार्गी लावले जात आहेत. त्याचप्रमाणे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून एकाच छताखाली योजनांचा लाभ देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, गिरणी कामगारांना हक्काची घरे लवकर मिळावीत यासाठी समिती नेमण्यात आली असून गिरणी कामगारांची पात्रता निश्चित करण्याच्या आणि घरे वाटप करण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. यामुळे नक्की किती घरे द्यायची आहेत ते समजून त्यापद्धतीने घरांची उपलब्धता निर्माण करता येईल. आज 251 गिरणी कामगारांना घरांच्या चाव्या देण्यात येत आहेत. याचपद्धतीने यापुढे जे पात्र होतील त्यांना तातडीने चाव्या देण्याची सूचना त्यांनी केली. पात्र कामगारांना घरांची उपलब्धता व्हावी यासाठी ठाणे जिल्ह्यात 43 हेक्टर जमिनीची पाहणी करण्यात आली असून यावर जेथे घरे बांधणे शक्य असेल तिथे घरकुल बांधून तयार करण्यात येतील, असे ते म्हणाले. या माध्यमातून घरांचे स्वप्न पूर्ण होत आहे, हा विश्वास गिरणी कामगारांमध्ये निर्माण केला जात आहे. ज्यांना आज घरे मिळाली त्यांना शुभेच्छा देऊन ज्यांना अद्याप घरे मिळालेली नाहीत त्यांनाही लवकरच घरे मिळावीत यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, मुंबई आणि गिरणी कामगारांचे आगळे वेगळे नाते आहे. मुंबईच्या विकासासाठी गिरणी कामगारांनी अतोनात कष्ट घेतले आहेत. मुंबईबरोबरच देशाच्या जडण-घडणीत तसेच राजकीय, सामाजिक चळवळीत या कामगारांचे मोठे योगदान आहे. घर हा जगण्याचा आधार असतो, नात्यांचा ओलावा असतो. त्याच अनुषंगाने स्वतःचे घर हा गिरणी कामगारांचा हक्क असून त्यांना घरांच्या चाव्या दिल्या जात आहेत याचे वेगळे समाधान आहे. गिरणी कामगारांसाठी शासनामार्फत मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती केली जात असून त्याचे वाटपही होत आहे. त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या माध्यमातून सर्वांना घरे उपलब्ध करून देण्यात येत असून सर्वांना घरे मिळावीत यासाठी प्रयत्नरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गिरणी कामगार समितीचे अध्यक्ष आमदार श्री. राणे यांनी प्रास्ताविकाद्वारे गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी म्हाडामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.

000