रत्नागिरी दि. ८ (जिमाका): प्रादेशिक मनोरुग्णालयात येणारे रुग्ण हे त्यांच्या शारीरिक, मानसिक स्थितीमुळे भरती झालेले असतात. या रुग्णांची अवहेलना होवू नये. डॉक्टरांनी त्यांना प्रयत्नपूर्वक घरगुती वातावरणाचा अनुभव द्यावा अशी अपेक्षा पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली .
जिल्हा प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस .एम. कलगुटकी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओठणकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले की, या रुग्णालयाच्या दुरुस्ती तसेच सुधारणा विषयक कामांकरीता २० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. याबाबतचा प्रस्ताव मंत्रालयालय स्तरावर पाठवावा. त्याचा पाठपुरावा करू अशी ग्वाही देऊन या मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या १६१ मनोरुग्णांना उद्यापासून सकाळच्या न्याहरीमध्ये दूधाचा समावेश करण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
या रुग्णालयाच्या सुधारणेकरिता जिल्हा नियोजनमधून सुमारे १ कोटी ८० लाख रुपये मिळाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक कलगुटकी यांनी दिली.
पालकमंत्र्यांनी शासकीय रुग्णालयाला भेट देऊन तेथील मंजूर व पेडिंग वैद्यकीय बिलांचा सविस्तर आढावा घेतला. आज दिवसभराच्या मॅरेथॉन दौऱ्यात पालकमंत्र्यांनी वैद्यकीय महाविद्यालय (माहिला रुग्णालय ), प्रादेशिक मनोरुग्णालय तसेच सिव्हिल हॉस्पिटल येथील इमारत पाहणी करून या सर्वांचा आढावा घेतला.
०००