रत्नागिरी दि. ८ (जिमाका): राज्याचे माजी कृषी मंत्री दिवंगत बाळासाहेब सावंत यांच्या स्वप्नातील सर्वांगीण विकसित कोकण घडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
मौजे जाकीमिऱ्या येथे उभारण्यात आलेल्या बाळासाहेब सावंत बहुउद्देशीय सभागृह, वाचनालय व दिवंगत बाळासाहेब सावंत यांच्या स्मारकाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.
मंचावर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सार्वजनिक बांधकामच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अमोल ओठणकर, रत्नागिरी न. पा. मुख्याधिकारी तुषार बाबर, जाकीमिऱ्याच्या सरपंच आकांक्षा कीर, यांच्यासह सावंत कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले की, दिवंगत बाळासाहेब सावंत यांनी कोकणसह राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या विचारांवरच आपण वाटचाल करत राहू.
जाकीमिऱ्या येथे उभारण्यात आलेल्या वाचनालयामध्ये एमपीएससी, यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील. याकरिता सुमारे दहा लाख रुपयाचा निधी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ उपलब्ध करुन द्यावा, त्याचबरोबर ही बहुउद्देशीय इमारत समुद्रालगत असल्याने नौदल व फिशरीजच्या अनुषंगाने काही कोर्सेस सुरू करता येतील का ? याची चाचपणी प्रशासनाने करावी अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली.
तत्पूर्वी पालकमंत्र्यांनी दिवंगत बाळासाहेब सावंत यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करुन सावंत कुटुंबीयांच्या निवासस्थानाला भेट दिली. तसेच मौजे जाकीमिऱ्या येथील विविध विकास कामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या सुमारे २ कोटी २० लाख रुपये रक्कमेच्या विकास कामांचे, मौजे सडामिऱ्या येथील १ कोटी ५० लाख रुपयांच्या विकास कामांचे त्याचबरोबर शिरगाव जिल्हा परिषद गटासाठी सुमारे १७ कोटी रुपयांच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी एमआयडीसीच्या प्रादेशिक व्यवस्थापक वंदना करमाळे, रत्नागिरीचे तहसिलदार राजाराम म्हात्रे, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव यांच्यासह संबधित गावांचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००