ठाणे, 12(जिमाका) :- मराठी उद्योजक मला भेटला की, आनंद होतो व त्याला मी आनंदाने भेटतो. केवळ नोकरी शोधणारा मराठी तरुण न राहता नोकरी देणारा मराठी तरुण घडविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी केले.
सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम डॉ. काशिराम घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री श्री. केसरकर बोलत होते. यावेळी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे संचालक अतुल अर्ते, सचिव विनित बनसोडे, प्रमुख मार्गदर्शक विलास शिंदे, उद्योजक अशोक दुकाडे, अजित मराठे, विजय पंराजपे, संतोष पाटील, नितीन बनसोडे, हर्षल मोरडे, संदिप कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, स्वर्गीय माधराव भिडे यांनी मराठी उद्योजकांना जोडण्याचे काम केले. विकासामध्ये औद्योगिकरणाचे महत्त्व सर्वाधिक असते आणि ज्या देशात औद्योगिकरण जास्त होते, तो देश जगातील बलवान देश असतो. महाराष्ट्र औद्योगिकरणामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. देशातील 10 मोठ्या उद्योगपतींपैकी 7 उद्योगपती हे महाराष्ट्रातील आहेत, याचा आपण अभिमान ठेवला पाहिजे. मराठी माणूस उद्योजक व्हावा म्हणून जे करावे लागेल ते सर्व प्रयत्न करण्यात येतील. सकारात्मक सरकार सत्तेमध्ये आहे, त्यामुळे उद्योजकांच्या अडचणींवर मार्ग काढले जातात.
भारत हा तरुणांचा देश आहे. उद्योजकांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुतवणूक केली पाहिजे. जीएसटीबद्दलच्या उद्योजकांच्या मागणीवर मुख्यमंत्री महाेदय व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करुन योग्य तो मार्ग काढण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
000000