मुंबई, दि. १४: ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा भाडे घेणे या विरुद्ध तक्रार करायची असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पश्चिम) यांनी व्हॉट्सअप क्रमांक ९९२०२४०२०२ व ई-मेल mh02.autotaxi complaint@gmail.com जारी केला आहे. प्रवाशांनी या क्रमांकावर व्हॉट्सअपच्या माध्यमातून वाहन क्रमांक, ठिकाण आणि गुन्ह्याचे स्वरूप अशा स्वरूपात तक्रार दाखल करावी, जेणेकरुन संबंधित दोषी वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार करवाई करता येईल.
याबाबत महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांच्या गैरवर्तनाबाबत तक्रार करण्यासाठी सु-मोटो याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या २३ जून २०२३ रोजी सुनावणी दरम्यान आयोगाने ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांच्या गैरवर्तन, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा भाडे घेणे याकरीता परिवहन विभागामार्फत प्रवाशांच्या तक्रारीकरीता व्हॉट्सअप क्रमांकाचे स्टिकर प्रवाशांना दिसेल, अशा पद्धतीने प्रदर्शित करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई यांनी व्हॉट्सअप क्रमांक जारी केला आहे. प्रवाशांनी प्रवासादरम्यान होणाऱ्या गैरसोयीबाबत या क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (पश्चिम) यांनी केले आहे.