नाशिक, दि. 14 (जिमाका वृत्तसेवा) :
‘शासन आपल्या दारी’अभियानातंर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रम यशस्वीपणे पार
करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केलेले आहे. कार्यक्रमाच्या
दिवशी येणाऱ्या नागरीक, लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये याची दक्षता घ्यावी.
तसेच सेवा भावनेने सर्व यंत्रणांनी हा कार्यक्रम यशस्वी करावा, असे प्रतिपादन
राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे
पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे शासन आपल्या दारी
कार्यक्रमाच्या पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे,
जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी
आशिमामित्तल, महानगरपालिका आयुक्त भाग्यश्री बानाईत, मुख्यमंत्री जन
कल्याण कक्षाचे राज्य मुख्य समन्वयक डॉ. अमोल शिंदे, मुख्यमंत्र्याचे विशेष
कार्यकारी अधिकारी अमित हुक्केरीकर, उपजिल्हाधिकारी नितिनकुमार मुंडावरे,
यांच्यासह सर्व शासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, कार्यक्रमास येणाऱ्या
लाभार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेस सुस्थितीत असाव्यात, तसेच बसमध्ये
नियुक्त केलेल्या समन्वयकांनी लाभार्थ्यांशी सुसंवाद साधून त्यांना आवश्यक
सूचना द्याव्यात.कार्यक्रम संपल्यानंतरही लाभार्थ्यांना त्यांच्या तालुक्याच्या
ठिकाणी सोडण्याची व्यवस्था जबाबदारीने पार पाडावी. त्याचप्रमाणे बसमध्येच
लाभार्थ्यांना फुड पॅकेटस देवून सकाळच्या नाश्त्याची देखील सोय करण्याच्या
सूचना पालकमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी दिल्या.
कार्यक्रमाच्या ठिकाणी उभारलेल्या विविध विभागांच्या स्टॉल्समध्ये
माहितीपत्रके ठेवण्यात यावीत व स्टॉल्सला भेट देणारे लाभार्थी व नागरिकांना
मार्गदर्शनासाठी स्वयंसेवकांना नियुक्त करण्यात यावे. त्याचप्रमाणे सेल्फी
पॉइंट्स, फिरते स्वच्छतागृह या ठिकाणी कचरा व घाण होवू नये याची
खबरदारी घेण्यात यावी. त्याचप्रमाणे लाभार्थ्यांना दुपारी देण्यात येणारे जेवण
हे दर्जेदार असावे. कार्यक्रमाच्या ठिकाणी वीज व्यवस्था, इंटरनेट, स्टेजच्या
बाजुस कंट्रोल रूम, ड्रोन कॅमेरा व्यवस्था आदी चोख ठेवण्याबाबत संबधित
अधिकाऱ्यांना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सूचित केले.
शासन आपल्या दारी कार्यक्रम स्थळाची पालकमंत्री यांनी केली पाहणी
आज बैठकीनंतर पालकमंत्री दादाजी भुसे शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या
नियोजित स्थळी भेट देवून सभामंडप कार्यक्रम स्थळी तयार करण्यात आलेले
स्टेज, बैठक व्यवस्था व अनुषंगिक बाबींची पाहणी केली यावेळी समवेत
खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी.,
अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधी, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे
यांच्यासह शासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.