विधानसभा प्रश्नोत्तरे

0
8

पाथरी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी ५ कोटींची तरतूद – मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. 18 : परभणी जिल्ह्यातील पाथरी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत सांगितले.

पाथरी येथील बसस्थानकातील छताचे प्लास्टर कोसळून तीन महिला जखमी झाल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य सुरेश वरपूडकर, अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला होता.

मंत्री श्री. भुसे म्हणाले, या घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर या जखमी महिलांच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती एसटी महामंडळाकडून करण्यात आली आहे. तसेच या बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक निधीची  तरतूद करण्यात आली असून लवकर काम सुरू करण्यात येईल.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

 

अंधेरीतील मोगरा नाल्यावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करणार – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 18 : अंधेरी (पश्चिम) ‘के’ प्रभागातील मोगरा नाल्यावर अनधिकृत बांधकाम झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

मुंबईतील अंधेरी (पश्चिम) ‘के’ प्रभागातील मोगरा नाल्यावरील अनधिकृत बांधकामाबाबत विधानसभा सदस्य सर्वश्री रणजित कांबळे, अशोक चव्हाण, योगेश सागर, अमित साटम, नाना पटोले, सुनील प्रभू, डॉ.भारती लव्हेकर, आशिष शेलार, राम कदम, वर्षा गायकवाड, यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना ते बोलत होते.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, मोगरा नाल्यावर झालेल्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करून या परिसरात पाणी साचणार नाही. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येतील.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

 

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांचे फायर ऑडिट करणार –  उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 18 : मुंबई महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या सर्व रुग्णालयांचे लवकरच फायर ऑडिट करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

मुंबई महानगरपालिका रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याने धोका निर्माण झाल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य सर्वश्री सुनील राऊत, अमित देशमुख, सुनील प्रभू, अमिन पटेल, आशिष शेलार, राम कदम, राजेश टोपे, अजय चौधरी, रवी राणा यांनी उपस्थित केला होता.

मंत्री श्री. सामंत म्हणाले, मुंबई महानगरपालिका अंतर्गत असलेल्या विविध रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात आले आहे. ज्या रुग्णालयांचे फायर ऑडिट राहिले आहे. किंवा काही त्रुटी राहिल्या आहेत, त्या लवकर पूर्ण करून अग्नि सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना आणि फायर ऑडिट प्रक्रिया ९० दिवसात करण्याच्या सूचना देण्यात येतील. तसेच रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल,असेही मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

 

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी निधी देणार – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 18 : पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून या परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्याबाबतचा प्रश्न सदस्य रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला होता.

मंत्री श्री. सामंत  म्हणाले की, नांदेड किरकीटवाडी व नांदोशी या गावांना 3 हजार मी.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून ग्रामपंचायत काळात अस्तित्वात असलेल्या नांदेड विहीर येथे पाणी आणून या पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडरचे द्रावण टाकून या गावांमध्ये अस्तित्वात असलेल्या वितरण व्यवस्थेमधून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

तसेच पुणे महानगरपालिकेमार्फत नव्याने समाविष्ट ११ व २३ गावांकरीता पाणीपुरवठा करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची कार्यवाही महानगरपालिकेमार्फत सुरू आहे.

या गावांना पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here