राजधानीत ५ व ६ ऑगस्ट रोजी “ग्रंथालय महोत्सव २०२३” चे आयोजन

नवी दिल्‍ली 20 : ग्रंथालयांच्या विकासाला आणि डिजिटलायझेशनला गती देण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने “ग्रंथालय महोत्सव 2023”  चे आयोजन केले  आहे.  या महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे.

राजधानीतील प्रगती मैदानामधील हॉल क्रमांक 5 येथे  5 व 6 ऑगस्ट 2023 रोजी  दोन दिवसीय ‘ग्रंथालय महोत्सव 2023’ चे आयोजन करण्यात येणार आहे. कायदा आणि न्याय मंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि सांस्कृतिक व संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी याबाबत नवी दिल्ली येथे “ग्रंथालय  महोत्सव” च्या वेळापत्रकाचे बुधवारी अनावरण केले. सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहसचिव मुग्धा सिन्हा यावेळी उपस्थित होते.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड या कार्यक्रमाच्या सांगता  समारंभाला उपस्थित राहतील. भारतातील ग्रंथालयांचे आधुनिकीकरण आणि डिजिटायझेशन यावर संवाद सुरू करण्यासाठी या महोत्सवात जगभरातील प्रतिष्ठित ग्रंथालयांची ओळखही यावेळी करून देण्यात येणार  आहे.

आधुनिक माहिती व तंत्रज्ञान साधनांचा वापर करुन, नव्या पिढीची मानसिकता ओळखून, त्यांच्या सोयीने पुस्तके अथवा ग्रंथातील ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहचविणे  हे या महोत्सवाचे उद्द‍िष्ट आहे. यामुळे भावी पिढीमध्ये वाचनसंस्‍कृती वाढेल तसेच  वाचन चळवळीला खरी गतीमानताही प्राप्त होईल.

00000000

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त क्र.126/ 20.7.2023