‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर २८ मार्च रोजी होणारी ‘एमसीए सीईटी’ परीक्षा ३० एप्रिल रोजी होणार – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

0
6

मुंबई, दि. 19 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने दि. 28 मार्च रोजी घेण्यात येणारी पदव्युत्तर संगणक प्रवेश (एमसीए) सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता दि. 30 एप्रिल 2020 रोजी होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे दिली. मंत्रालयात याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी श्री.सामंत बोलत होते.

श्री.सामंत म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून सीईटी परिक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी काळजी करु नये, त्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही.

एप्रिलमध्ये होणाऱ्या सीईटी परिक्षांबाबत दि. 31 मार्चनंतर राज्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावाची परिस्थिती पाहून सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी करु नये याबाबत शासनाला सहकार्य करावे आणि सर्वांनी कोरोनासंदर्भात स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन श्री. सामंत यांनी केले.

बैठकीस राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलचे अध्यक्ष श्री. जे.पी डांगे, आयुक्त संदीप कदम, आदी अधिकारी उपस्थित होते.

००००

काशिबाई थोरात/वि.सं.अ./19/03/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here