पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी घेतला जिल्ह्यातील स्थितीचा आढावा; यंत्रणांना दिले सर्तकतेचे निर्देश

0
9

सातारा दि. 22 (जिमाका) : सातारा जिल्ह्याला देण्यात आलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी सर्व प्रशासकीय यंत्रनेकडून जिल्ह्यातील परिस्थतीचा आढावा घेतला. निवारा शेडमध्ये असणा-या नागरिकांना अन्न , शुध्द पिण्याचे पाणी, औषधे आदी सर्व अनुषंगिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी जमिन उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक त्या सर्व मार्गाचा अवलंब करावा. रात्री अपरात्री लोंकाना औषध उपचारासाठी कोणतीही गैरसोय होऊ नये 24×7 प्राथमिक आरोग्य केंद्रे उपलब्ध राहतील याची आरोग्य यंत्रणेने सर्वोतोपरी दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.

यावेळी पालकमंत्री यांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सातारा जिल्हृयाकडे लक्ष असून पावसाळी स्थितीत आवश्यक त्या सर्व उपाय योजनांसाठी निधी कमी पडु देणार नसल्याची  त्यांनी ग्वाही दिल्याचे सांगितले.

पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दूरदृष्यप्रणाली द्वारे जिल्हयातील स्थितीचा आढावा प्रशासकीय यंत्रणेकडुन घेतला. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधिक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी,  निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटी ,यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, विविध शासकीय यंत्रणांचे प्रमुख यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री शंभुराज देसाई म्हणाले, पावसाळी परिस्थीतीत पाणी तुंबू नये यासाठी सक्तीने नाले सफाई करावी. फॉगींग करावे, नागरिकांना शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झालेल्या ठिकाणी अधिकचे मनुष्यबळ वापरुन लवकरात लवकर विद्युत प्रवाह सुरळित करण्यात यावा. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी दारु पिऊन हुल्लडबाजीचे प्रमाण वाढले आहे. धोकादायकपणे पर्यटकांनी पाण्यात जाऊ नये यासाठी  वनविभाग पोलीस व उत्पादनशुल्क यांनी संयुक्तपणे नियमन करावे असेही निर्देश त्यांनी दिले.

खा.श्रीनिवास पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील पुर्नवसनाच्या कार्यक्रमाची गतीने अमलबजावणी व्हावी यासाठी दरमहा बैठक घेऊन आढावा घेण्यात यावा. पावसाळ्यातील वाहतुक सुरळीत व्हावी यासाठी नियोजन करण्यात यावे, असे सांगुन सातारा जिल्ह्यासाठी लवकरच जवळपास 2 कोटी रु किमतीची सुस्सज्ज व अद्ययावत ॲम्ब्युलन्स केंद्र सरकारकडून उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी कराड येथे विमानाची धावपट्टी मोठी करण्यासाठी पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

यावेळी आढावा देताना  जिल्हाधिकारी  जितेंद्र डुडी म्हणाले, कोयना धरण 43.14 टिएमसी भरले असून जिल्ह्यातील सर्व धरणातील एकूण पाणीसाठा टक्केवारी 44.27 टक्के आहे. सद्यस्थितीत धोम-बलकवडी धरण क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात वाढ होत असल्याने आज सांयकाळ पासून दोन हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. सातारा -कास- बामनोली रस्त्यावर सांबरवाडी या ठिकाणी धोकादायक स्थितीतील दगड काढण्यासाठी  सोमवारी बोगद्यापासून ते कासला जाणारा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे दरड कोसळून वाहतुकीस अडथळा निर्माण झालेल्या ठिकाणी आवश्यकत्या उपाययोजना तात्काळ राबवून सर्व वाहतूक सुरळीत करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात तात्पुरते 47 निवारा शेड बांधण्यात आले असून सातारा तालुक्यातील मोरेवाडी येथील 18, सांडवली येथील 20, भैरवगड येथील 60, जावळी तालुक्यातील बोंडारवाडी येथील 6, भूतेर येथील 3, वहीटे येथील 3, वाटंबे येथील 2, वाई तालुक्यातील जोर येथील 8, गोळेगाव-गोळेवस्ती येथील 4, पाटण तालुक्यातील मिरगाव, हुंबरळी, ढोकावळे येथील 150, गुंजाळी येथील 6, म्हारवंड येथील 56, जोतिबाची वाडी येथील 5, सवारवाडी येथील 18, पाबळवाडी येथील 4, बोंगेवाडी येथील 14, केंजळवाडी येथील 21, कळंबे येथील 4, जिमनवाडी येथील 22, तर महाबळेश्वर तालुक्यातील माचुतर, एरंडल, शिंदोळा, दुधोशी, दरे,चतुरबेट, मालुसर, एरणे येथील 65 अशा एकूण 489 कुटुंबाचे तात्पुरते स्थलांतरण करण्यात आले आहे. या नागरिकांना अन्न, शुध्द पेय जल व अन्य अनुषंगिक सुविधा पुरविण्यात येत असल्याची माहिती ही जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली.

तसेच धोकादायक गावातील नागरिकांना संबंधित गावातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्यामार्फत सुरक्षित ठिकाणी अथवा नातेवाईकांकडे स्थलांतरीत होण्याबाबत सुचीत करण्यात आले आहे. दरड प्रवण गावांकरीता संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नदीकाठची संभाव्य पूरप्रवण गावे, संभाव्य दरड प्रवण गावे अशा 96 गांवाचे जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया पुणे यांच्यामार्फत फेरसर्वे करण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी जिल्हा परिषदेची सर्व यत्रंणा, आरोग्य पथके प्रत्यक्ष कार्यस्थळावर आहेत. कामकाज सुरळीतपणे चालु आहे, असे सांगितले.

यावेळी पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी दरड कोसळणे अथवा भूस्खलनासारखे प्रकार साधारणपणे रात्रीच्या वेळी होत असल्याने संवेदनशील ठिकाणी रात्रीच्या पोलीसांच्या गस्ती वाढविण्यात आल्याचे सांगितले.

                                  000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here