रायगड जिल्ह्यातील क्रीडा संकुलांच्या नूतनीकरणाची कामे तातडीने पूर्ण करावीत – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

0
5

मुंबई, दि. 25 : रायगड जिल्ह्यातील तालुका व जिल्हा क्रीडा संकुलांच्या नूतनीकरणासाठी निधी वितरित केला आहे. त्या संकुलांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले. नवीन क्रीडा संकुल उभारणे आणि जुन्या क्रीडा संकुलाची देखभाल दुरुस्ती यासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित विभागीय क्रीडा संकुल तसेच जिल्हा व तालुका क्रीडा संकुलांच्या सद्य:स्थितीबाबत आढावा बैठकीचे आज आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री कु. तटकरे बोलत होत्या.

क्रीडा संकुलासाठी निधी वितरित करणे तसेच, संबंधित कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना क्रीडा मंत्री श्री. बनसोडे यांनी दिल्या. तसेच मार्गदर्शक पदे व क्रीडा अधिकारी पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असून करार पद्धतीने पदे भरण्याची प्रकिया जलद गतीने राबविण्याचेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, माणगांव, तळा, श्रीवर्धन, म्हसळा, रोहा येथील तालुका क्रीडा संकुलाच्या कामांसाठी निधी मंजूर असून, संबंधित निविदा प्रकिया गतीने राबवाव्यात. क्रीडा अधिकाऱ्यांनी आतापर्यंत झालेल्या कामाचा अहवाल सादर करावा. तसेच पुढील कामे डिसेंबरपर्यंत तातडीने पूर्ण करावी. त्यानंतर पुढील कामांसाठी निधी वितरित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रीडा संकुलासाठीच्या देखभाल निधीचा योग्य वापर करून, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंची प्रशिक्षक म्हणून निवड करावी. राज्यस्तरावर वास्तुविशारदांची नामिका सूची आहे, त्यांनाच विभागातील क्रीडा संकुलासाठी सल्लागार म्हणून नियुक्त करावे.  क्रीडा संकुलात विविध क्रीडा प्रकाराच्या सोयी सुविधेसह, संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते, चेंजिंग रूम, जुनी इमारत दुरूस्ती, विद्युतीकरण, पाणी व्यवस्था या सुविधाही चांगल्या दर्जाच्या देणे गरजेचे असल्याचे मंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.

या बैठकीत क्रीडा विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील हंजे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here