लोकमान्य टिळक जन्मस्थान स्मारकाचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण होणार- पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी, दि.१ (जिमाका) :  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालकमंत्री उदय सामंत यांनी येथील लोकमान्य टिळक जन्मस्थानी असणाऱ्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. स्मारकातील अर्धपुतळ्यासही अभिवादन केले. या स्मारकाच्या सुशोभिकरणाचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण होणार असून, त्यादिवशी लोकार्पण करण्याचा मनोदय असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

अभिवादनानंतर पालकमंत्री श्री. सामंत यांनी स्मारकाची पाहणी करत लवकरात लवकर सुशोभिकरणाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आपण जमलो आहोत. ऐतिहासिक वास्तूच्या सुशोभिकरणासाठी साडेचार कोटीचा निधी दिला आहे. त्याचे कामही सुरु आहे. २६ जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. २६ जानेवारीला त्याचे लोकार्पण करु. असे कणखर नेतृत्व रत्नागिरीतून तयार झाले, याचा आम्हाला अभिमान असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू उर्फ महेश म्हाप, माजी नगराध्यक्ष राहूल पंडित आदी उपस्थित होते.