महसूल सप्ताहानिमित्त कोकण विभागीय आयुक्त, मुंबई (शहर) जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी साधला युवक व युवतींशी संवाद

मुंबई, दि.२ : महसूल सप्ताहानिमित्त  चेतना महाविद्यालय, वांद्रे येथे विविध 70 महाविद्यालयांच्या एन.एस.एस. मधील सुमारे 250 युवक व युवतींशी आयुक्त, कोकण विभाग डॉ. महेंद्र कल्याणकर व मुंबई (शहर) जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी संवाद साधला.

यानिमित्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी महसूल प्रशासनाची माहिती व त्यामध्ये युवकांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी महसूलदूत म्हणून कार्य करुन महसूल विभागातील योजना व उपक्रमांची माहिती इतरापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. डॉ.राजेंद्र भोसले यांनी विद्यार्थ्यांच्या प्रशासनविषयक प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे  निरसन केले. महसूल प्रशासनाची कार्यपद्धती व महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची व योजनांची माहिती त्यांनी यानिमित्त विद्यार्थ्यांना दिली.

सदर कार्यक्रमास चेतना संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मधुमिता पाटील यादेखील उपस्थित होत्या. त्यांनीही यानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधला व विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणासमवेत प्रशासनातील योजनांची व उपक्रमांची माहिती घेण्याचे सूचित केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड यांनी केले. महसूल सप्ताहमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. निवडणूक उपजिल्हाधिकारी तेजस समेळ यांनी निवडणूक ओळखपत्राबाबतची माहिती दिली, उपविभागीय अधिकारी भागवंत गावंडे यांनी शैक्षणिक दाखले व त्यासंदर्भात आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहिती दिली. समाजकल्याणचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी शिष्यवृत्ती व विविध योजनांची  माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज साळुंके व आभारप्रदर्शन तहसिलदार सचिन चौधर यांनी केले. कार्यक्रमामध्ये शिष्यवृत्तीच्या योजनांची माहिती दर्शविणारी पत्रके, महसूल योजना व विविध दाखलेबाबत माहिती दर्शविणारी पत्रके तसेच नोंदणी विभागामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवांची माहिती दर्शविणारी पत्रके विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली.

००००

संध्या गरवारे/विसंअ/