नवी दिल्ली, 02 : माहे जुलै 2023 मध्ये जीएसटी संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या पाच राज्यांमध्ये अव्वल ठरले आहे. देशात जुलै 2023 मध्ये जीएसटी संकलन 1,65,105 कोटी रुपये झाले असून, राज्यात 26 हजार 64 कोटी रुपये कर महसूल संकलित झाला आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत 18 टक्क्यांनी वाढले आहे.
अर्थ मंत्रालयाकडून जीएसटी संकलनाबाबत जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, माहे जुलै 2023 मध्ये देशात संकलित झालेला सकल वस्तू आणि सेवा कर महसूल 1,65,105 कोटी रुपये असून त्यापैकी 29,773 कोटी रुपये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर, 37,623 कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर, तर 85,930 कोटी रुपये एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (वस्तूंच्या आयातीतून संकलित केलेल्या 41,239 कोटी रुपयांसह) आणि 11,779 कोटी रुपये उपकर (वस्तूंच्या आयातीतून संकलित केलेल्या 840 कोटी रुपयांसह) रुपात संकलित करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने, एकात्मिक वस्तू आणि सेवा करापैकी 39,785 कोटी रुपये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर तसेच 33,188 कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर रुपात मंजूर केले आहेत. नियमित मंजूरीनंतर, जुलै 2023 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटी (CGST) साठी 69,558 कोटी रुपये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर तसेच 70,811 कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर इतका आहे.
देशातील जुलै 2023 चा महसूल मागील वर्षीच्या याच महिन्यातील वस्तू आणि सेवा कर महसुलाच्या तुलनेत 11% ने अधिक आहे. या महिन्यात, देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलाच्या तुलनेत 15% ने अधिक आहे. तर, महाराष्ट्राच्या वस्तू आणि सेवा कर संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 18 टक्क्याने वाढ झाली असून जुलै 2023 मध्ये 26064 कोटी रुपये कर महसूल संकलित झाला आहे. महाराष्ट्रात जुलै 2022 मध्ये 22,129 कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर संकलित झाला होता.
माहे जुलै 2023 मध्ये जीएसटी संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या 5 राज्यांमध्ये अव्वल आहे. या यादीत 11,505 कोटींच्या संकलनासह कर्नाटक दुसऱ्या तर तामिळनाडू 10,022 कोटींच्या संकलनासह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
000000
अमरज्योत कौर अरोरा /वृत्त क्र.141/ 02.08.2023