रस्ते सुरक्षेसाठी जनजागृती अभियान राबवावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. 2 : वेगावर नियंत्रण नसणे, नियमांचे पालन न करणे या कारणांमुळे वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतुकीच्या नियमांबाबत अभियान स्तरावर जनजागृती अभियान राबवण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी आज दिल्या.

सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या महामार्गावरील वाहतूक वेग नियंत्रण, निर्धारित मार्गिकेची शिस्त तसेच एस.टी. बसस्थानकाची व बसची स्वच्छता, दुरूस्ती इत्यादी संदर्भातील कामांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री श्री. भुसे यांनी अपघात नियंत्रणासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

महामार्ग वाहतूकचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रवींद्र सिंगल, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आदींसह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री भुसे म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्ते सुरक्षेसंदर्भात नुकतीच रस्त्यांची पाहणी करून दिलेल्या सूचनांचे पालन होणे गरजेचे असल्याचे सांगितले. रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीस विलंब होत असल्याने ही कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

मुंबई-पुणे महामार्ग, समृद्धी महामार्गासमवेत इतर राष्ट्रीय महामार्गावरील अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, महामार्गावर थांबे तसेच टोलनाका येथे वाहन चालकांचे प्रबोधन करण्यासाठी अभियान राबविण्यात यावे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण तसेच निर्धारित मार्गिकेची शिस्त पाळण्यासंदर्भात महिनाभर अभियान राबविण्यात यावे.

तसेच, वाहनांमध्येच वेगावर नियंत्रण करण्यासाठीची यंत्रणा बसविणे, महामार्गावर पोर्टल लावण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येईल का याबाबत अभ्यास करून आखणी करण्यात यावी.  पोलीस प्रशासन, आरटीओ, परिवहन, सार्वजनिक बांधकाम या विभागांनी एकत्रितरित्या समन्वयाने हे अभियान राबवावे, असेही मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

एस.टी.बस थांब्यांची रंगरंगोटी, एसटी बसची डागडुजी आणि बस थांब्यावर सुविधा देण्यासाठीच्या कामास गती द्यावी. किमान ५०० बसथांब्यांची तत्काळ रंगरंगोटी करावी. एसटी तसेच खासगी बस चालकांच्या संघटनांच्या  वाहन चालक – वाहकांनाही अपघात नियंत्रणासंदर्भातील प्रशिक्षण द्यावे.  महामार्गावर हेल्थ टॅक्रिंग प्रणाली लावण्यात यावी. आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करावे आणि एसटीच्या नवीन बसेस घेण्याच्या प्रक्रियेस गती देण्याचे निर्देशही सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी दिले.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/