‘दिलखुलास’ कार्यक्रमात पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांची ५, ७ व ८ ऑगस्टला मुलाखत

मुंबई, दि.3: शेतीला खत आणि घरात दुधासारखा सकस आहार, या उद्देशाने केल्या जाणाऱ्या पशुपालनाने आज व्यावसायिक स्वरुप धारण केले आहे. त्याअनुषंगाने शेतकरी व पशुपालकांनी पावसाळा आणि साथरोगाच्या कालावधीत आपल्या जनावरांची वेळोवेळी तपासणी करून लसीकरण करून काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून केले आहे.

पावसाळ्यात मानवी आरोग्यावर जसा परिणाम होतो, त्याचप्रमाणे जनावरांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याचा धोका असतो. ही बाब लक्षात घेता पशुपालक किंवा शेतकरी बांधवांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे तितकेच महत्वाचे आहे.  सध्या राज्यात पशुसंवर्धन विभागातर्फे देशपातळीवरील लाळखुरकूतृ नियंत्रण लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जनावरांमध्ये विविध प्रकारचे आजार आढळतात. त्यात जिवाणूजन्य, विषाणूजन्य आणि संसर्गजन्य आजार असे प्रकार असतात. विविध माध्यमांतून निरोगी जनावरांना या आजारांची लागण होते. अनुकूल हवामान, परिस्थिती असल्यास विषाणू, जिवाणूंचा जनावरांच्या विविध अवयवांत प्रादुर्भाव वाढतो. अशा आजारांच्या लक्षणांची माहिती आणि त्यावरील उपाययोजना याबाबतची सविस्तर माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. मुकणे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत शनिवार दि. 5, सोमवार दि. 7, मंगळवार दि. 8 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक योगेश रांगणेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

०००

सागरकुमार कांबळे/स.सं