गोंडगाव येथील खटला जलदगती न्यायालयात चालवणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
16

जळगाव, दि.६ (जिमाका)- गोंडगाव येथील घटना माणुसकीला काळिमा फासणारी  आहे. या घटनेतील पीडित बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आरोपीला फाशीची सजा देण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल, अशी ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिली.

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह गुरांच्या गोठ्यात लपवून ठेवल्याची अमानवी घटना ३० जुलै रोजी घडली होती. स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (वय-१९) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. त्याने घटनेची कबुलीही दिली आहे. या घटनेची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शनिवारी, दि.५ ऑगस्ट रोजी बालिकेच्या कुटुंबाशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता‌. आज जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गोंडगाव येथे पीडितेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, स्थानिक गावकरी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, पीडितेच्या कुटुंबाचे शासनाच्या वतीने पुनर्वसन करण्यात येईल. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन बांधिल आहे. आठ दिवसांच्या आत या घटनेत चार्जशीट दाखल करत हा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल.

शासन या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या कुटुंबास लवकरात लवकर घरकुल योजनेचा लाभही देण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here