“मेरी माटी – मेरा देश” हे अभियान लोकसहभागातून राज्यात यशस्वी करावे – प्रधान सचिव विकास खारगे

0
3

मुंबई, दि. ७ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह देशभर आयोजित ‘मेरी माटी – मेरा देश’ अर्थात ‘माझी माती – माझा देश’ या अभियानाने होणार असून राज्यात लोकसहभागातून हे अभियान यशस्वी करावे, अशा सूचना मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य प्रधान सचिव विकास खारगे यांनी दिल्या.

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधत श्री. खारगे यांनी या अभियानाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला व उपयुक्त सूचना दिल्या.

“देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार असून सर्व यंत्रणांनी याचे सूक्ष्म नियोजन करावे. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून व जास्तीत जास्त लोकसहभागातून हे अभियान उत्तमप्रकारे आयोजित करावे. पंच प्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन यांसारखे उपक्रम तसेच गाव, पंचायत, गट, शहर, नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक शूरवीरांच्या त्यागाला वंदन करणारे शिलाफलक किंवा स्मारक फलक शहरी आणि ग्रामीण भागात उभारणे हे उपक्रम आयोजित करावयाचे आहेत”, असे श्री. खारगे यांनी सांगितले.

“९ ते ३० ऑगस्ट, २०२३ दरम्यान, ‘मेरी माटी – मेरा देश’ मोहिमेत गाव आणि गट स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्था तसेच राज्यस्तरावरील कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. दिल्लीत ‘अमृत वाटिका’ तयार करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून ७५०० कलशांमध्ये माती घेऊन ‘अमृत कलश यात्रा’ काढण्यात येणार असून ही ‘अमृत वाटिका’ ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या वचनबद्धतेचे प्रतीक असणार आहे. जनसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी (जन भागीदारी) https://merimaatimeradesh.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून, लोक माती किंवा मातीचा दिवा हाती धरून काढलेला सेल्फी या संकेतस्थळावर अपलोड करू शकतील”, अशी माहिती श्री. खारगे यांनी दिली.

“भारताला विकसित देश बनवणे, गुलामगिरीची मानसिकता दूर करणे, आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगणे, एकता आणि बंधुता टिकवून ठेवणे, नागरिकाची कर्तव्ये पार पाडणे आणि देशाचे रक्षण करणाऱ्यांप्रती आदर व्यक्त करणे यावर आधारित प्रतिज्ञा घेणे व प्रतिज्ञा घेतल्यानंतर सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र वेबसाइटवरून डाउनलोड करणे, या उपक्रमात सहभागी होण्यासाठी जनतेला आवाहन करावे”, असेही श्री. खारगे म्हणाले.

३० ऑगस्ट २०२३ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत कर्तव्य पथ, नवी दिल्ली येथे अभियानाचा समारोप समारंभ होणार आहे. संपूर्ण अभियानाचे उत्कृष्ट नियोजन व आयोजन करण्याच्या तसेच अभियान प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना प्रधान सचिव श्री. खारगे यांनी दिल्या.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here