स्वातंत्र्यसैनिक, वीरांना वंदन करणारे मेरी माटी, मेरा देश अभियान    

भारत देश आज जगात सर्वात मोठी लोकशाही असलेला महासत्ता देश आहे. देशाने अनेक क्षेत्रांत प्रगती केली आहे. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ज्ञात-अज्ञात देशवासियांनी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या त्यागामुळेच स्वातंत्र्याची पहाट उगवली. आज देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ होत असतानाच त्यांच्या या त्यागाचे स्मरण करणे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या मेरी माटी, मेरा देश या अभियानाच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, सर्वस्व गमावलेल्या, बलिदान दिलेल्या त्या सर्व ज्ञात, अज्ञात देशवीरांप्रती नतमस्तक होण्याची, अभिवादन करण्याची संधी आपल्या प्रत्येकाला मिळाली आहे.

स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देता त्यापासून प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्यासाठी प्रत्येक भारतीयाला उद्युक्त करणारा हा उपक्रम आहे. आज दि. 9 ऑगस्ट म्हणजे क्रांतीदिनी या अभियानाचा शुभारंभ होत आहे. संपूर्ण देशात, संपूर्ण राज्यात एकाच कालावधीत हे अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत शिलाफलक, वसुधा चंदन, स्वातंत्र्यसैनिक, वीरांना वंदन, पंच प्रण (शपथ घेणे), ध्वजारोहण व राष्ट्रगान अशा पाच उपक्रमांतून क्रांतिकारक व आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका, सर्व नगरपालिका, नगरपंचायती, सर्व पंचायत समिती व 696 ग्रामपंचायतींमध्ये या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले असून “मेरी माटी मेरा देश” अभियान राबविण्यात येत आहे.

ज्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्राणांची आहुती दिली, त्यांचे स्मरण करण्याचा हा उपक्रम आहे. ज्यांनी मिळालेले स्वातंत्र्य अखंड, अबाधित ठेवण्यासाठी प्राण खर्चिले, त्यांना सलाम, वंदन, प्रणाम करण्याचा, त्यांच्याप्रति नतमस्तक होण्याचा हा उपक्रम आहे. त्याचबरोबर भावी पिढीमध्ये देशभक्तीची ज्योत प्रज्वलित होण्यास मदत होईल. या माध्यमातून देशभक्तीचा ध्येयवाद रूजविला जाईल.

मेरी माटी, मेरा देश या अभियानात सर्व स्थानिक नागरी स्वराज्य संस्था सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार दिनांक ०९ ते १४ ऑगस्ट २०२३ या दरम्यान कोणत्याही एका दिवशी पुढीलप्रमाणे पाच उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.

१) शिलाफलक

या उपक्रमांतर्गत शहर/गावातील संस्मरणीय अशा ठिकाणी महानगरपालिका/नगरपालिका/ नगरपंचायत /शाळा/ कॉलेज इ.) शिलाफलकाची उभारणी करण्यात येणार आहे. शिलाफलकावर लिहिण्यासाठी स्थानिक नागरी स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान दिले, अशा थोर व्यक्तिंची नावे निश्चित करून शिलाफलकाची उभारणी करण्यात येणार आहे.

२) वसुधा चंदन

यामध्ये शहरातील योग्य ठिकाण निवडून वसुधा चंदन म्हणून ७५ देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करून अमृत वाटिका करण्यात येत आहे.

३) स्वातंत्र्यसैनिक, वीरांना वंदन

स्थानिक नागरी स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी स्वातंत्र्यासाठी व मातृभूमीच्या सुरक्षेसाठी बलिदान केलेल्या सेवानिवृत्त जवान, पोलीस दल, स्वातंत्र्यसैनिक यांच्या परिवारातील सदस्य यांचा कार्यक्रमावेळी स्थानिक पध्दतीनुसार सन्मान करण्यात येणार आहे.

(४) पंच प्रण (शपथ घेणे)

स्थानिक नागरी स्वराज्य संस्थेच्या स्तरावरील लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी व कर्मचारी, तसेच शहरवासिय पंच प्रण/शपथ घेतील. हातात दिवे लावून शपथ घेण्यासाठी दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत असलेल्या बचतगटाच्या माध्यमातून तयार केलेल्या मातीचे दिवे खरेदी करण्यात येणार आहेत.

५) ध्वजारोहण कार्यक्रम

स्थानिक नागरी स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रातील (अमृत सरोवर / शाळा/कार्यालय ) यापैकी एका योग्य ठिकाणी कार्यक्रम घेऊन राष्ट्रगीत गायन व तिरंगा फडकविण्यात येणार आहे. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, युवक मंडळ, महिला बचत गट, सर्व नागरिक यांचा सहभाग घेण्यात येणार आहे.

अभियानाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात येणार असून अभियान अनुषंगिक विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

या अभियानात जनसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी https://merimaatimeradesh.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून, नागरिक माती किंवा मातीचा दिवा हाती धरून काढलेला सेल्फी या संकेतस्थळावर अपलोड करता येणार आहे. या कृतीतून भारताला विकसित देश बनविणे, गुलामगिरीची मानसिकता दूर करणे, आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगणे, एकता व बंधुता टिकवून ठेवणे, आदर्श नागरिकाची कर्तव्ये पार पाडणे आणि देशाचे रक्षण करणाऱ्याप्रती आदर व्यक्त करणे असे अनेक हेतू आहेत.

एकूणच भारतीय स्वातंत्र्याची गाथा भावी पिढीला माहिती होण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना व नागरिकांना सहभागी करून घेतल्यामुळे प्रत्येकाला हे अभियान आपले वाटणारे आहे.

संकलन

संप्रदा बीडकर

जिल्हा माहिती अधिकारी, सांगली