मुंबई, दि. 11 : पुणे येथे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. त्या विद्यापीठामध्ये जपानची मदत घेऊन राज्यातील खेळाडूंना क्रीडा वैद्यकशास्त्र आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रशिक्षण देण्यासंदर्भात क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि जपानचे शिष्टमंडळ यांच्यात सविस्तर चर्चा झाली.
मंत्री श्री. बनसोडे यांची जपानच्या शिष्टमंडळाने अलिकडेच भेट घेतली. शिष्टमंडळात मुंबईचे कौन्सुल जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाता, डेप्युटी चीफ ऑफ मिशन कनेक तोशिहिरो, पोलिटिकल सेक्शन रिसर्चर शिमादा मेगुमी तसेच आमदार बाबासाहेब मोहनराव पाटील उपस्थित होते.
महाराष्ट्राचे क्रीडा विद्यापीठ आणि जपानचे क्रीडा विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. जपानमध्ये झालेल्या 2020 टोकियो ऑलिंपिक स्पर्धेनंतर तेथील ऑलिंपिक वस्तू संग्रहालयाच्या धर्तीवर पुणे येथे होत असलेल्या भव्य अशा ऑलिंपिक भवनात ऑलिंपिक संग्रहालय तयार करता येऊ शकेल, यावरही चर्चा करण्यात आली.
जपानने तंत्रज्ञान, पर्यावरण, क्रीडा क्षेत्रात भरीव काम केले. त्यामुळे जपान आज क्रीडाक्षेत्रात अग्रेसर देश आहे. तसेच जपान हा शिस्तप्रिय, पर्यावरणपूरक जीवनपद्धती, बुद्धीजम मानणारा देश आहे. त्यामुळे बुद्धीजम, क्रीडा, बंदरे, युवक कल्याण अशा विषयांवर जपानसोबत काम करता येईल, असे मत मंत्री श्री.बनसोडे यांनी व्यक्त केला.
जपानच्या शिष्टमंडळाने सकारात्मक प्रतिसाद देत, भारत-जपान संबंध दृढ करण्याची ही योग्य वेळ असल्याचे मत जपानचे कॉन्सुल जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाता यांनी व्यक्त केले. लवकरच या संदर्भात विस्तृत चर्चा करण्यासाठी जपान उत्सुक असल्याचे शिष्टमंडळ सदस्यांनी सांगितले.
मंत्री श्री. बनसोडे यांनी राष्ट्रकुल महाराष्ट्र विधिमंडळ सदस्यांसमवेत संसदीय मंडळ (CPA) महाराष्ट्र शाखेतर्फे आयोजित केलेल्या जपान येथे अभ्यास दौरा केला. त्यादरम्यान जपानसोबत त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. श्री. बनसोडे हे मंत्री झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यासाठी जपानचे शिष्टमंडळ मंत्रालयात त्यांना भेटण्यासाठी आले होते. मंत्री श्री.बनसोडे यांनी यावेळी शिष्टमंडळाच्या सदस्यांचा पुष्पगुच्छ देवून यथोचित सन्मान केला.
0000
राजू धोत्रे/विसंअ/