रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी आरोग्यवर्धक रानभाज्या महत्वपूर्ण : पालकमंत्री दादाजी भुसे

0
9

नाशिक, दिनांक: 14  (जिमाका वृत्तसेवा): सध्याच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी राहून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आहारामध्ये नैसर्गिक रानभाज्यांचा वापर करणे महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

आज कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय  दोन दिवसीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) च्या प्रांगणात करण्यात आले आहे. त्यावेळी पालकमंत्री श्री भुसे बोलत होते. या कार्यक्रमास विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, रामेती संस्थेचे प्राचार्य शिवाजी आमले, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाठ, यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी, तालुक्यातील बचत गटांचे सदस्य, शेतकरी उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, कोरोना काळात प्रत्येकाला निरोगी जीवनाचे महत्व समजले आहे. निरोगी आरोग्यासाठी निसर्गाने निर्माण केलेला रानभाज्यांचा ठेवा जतन केला जात आहे. रानभाज्यांच्या वापरास प्रोत्साहन देवून त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याकरिता कृषी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तसेच आत्मा कार्यालयाच्या आवारात यासाठी कायमस्वरूपी स्टॉल उपलब्ध करून देण्यासाठी ही प्रयत्न करण्यात येत आहेत. रानभाज्यांचे महत्व शहरी भागातील नागरिकांना कळण्यासाठी कृषी विभागाने मोहिमस्तरावर नियोजन करावे, असे ही पालकमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी या रानभाजी महोत्सवाला शुभेच्छा देतांना सांगितले की, रानभाज्या म्हणजे माणसांच्या निरोगी आरोग्यासाठी निसर्गाने दिलेली देणगी आहे. दुर्गम भागातील शेतकरी बांधवांना रानभाज्यांचे महत्व सर्वसामान्य नागरिकांना तंत्रशुद्ध पद्धतीने सांगण्यासाठी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. हा रानभाजी महोत्सव केवळ एक दोन दिवसांच्या कालावधीसाठी आयोजित न करता त्यामध्ये सातत्य ठेवण्याची अपेक्षा यावेळी विधानसभा उपाध्यक्ष श्री. झिरवाळ यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाच्या प्रास्तविकात रानभाजी महोत्सवाचे महत्व व त्यामध्ये शहरवासियांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या पाककृती यांची माहिती आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांनी दिली. या रानभाजी महोत्सवात जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील साधारण 45 स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यामध्ये विविध रानभाज्या, त्यांच्या पाककृती व खाद्य पदार्थांचे देखील स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते काही बचत गटांचा सन्मान करण्यात आला.

विशेष पोलीस महानिरिक्षक कार्यालयातील फाऊटंनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

रानभाजी महोत्सव कार्यक्रमापूर्वी विशेष पोलीस महानिरिक्षक कार्यालयाच्या दक्षता या इमारतीच्या प्रांगणात नव्याने उभारण्यात आलेल्या फाऊटंनचे उद्घाटन पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते आज संपन्न झाले.

 यावेळी नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, पोलीस अधिक्षक (ग्रामीण) शहाजी उमाप यांचेसह कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here