उत्तम आचरणाने ताडोबातील पर्यटकांची मने जिंका- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

0
9

चंद्रपूर, दि. १६ : वाघ हा अभिमानाचा विषय असून वाघाची गती आणि शक्ती हे पराक्रमाचे प्रतिक मानले जाते. जगात १४ देशात वाघ असून त्यापैकी ६५ टक्के वाघ हे भारतात आहेत आणि जगातील सर्वाधिक वाघ हे एकट्या चंद्रपुरात आहे. येथे येणारा देश– विदेशातील पर्यटक आनंद, ज्ञान, उर्जा, उत्साह घेऊन जाईल. पण आपल्या चुकीच्या आचरणाने ताडोबाच्या नावाचा अपप्रचार होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. येथे मिळालेली सन्मानाची वागणूक पर्यटकाला आयुष्यभर लक्षात राहिली पाहिजे, असे आचरण ठेवून ताडोबात येणाऱ्या पर्यटकांची मने जिंकावी, अशी आवाहन वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

मोहर्ली येथे निसर्ग पर्यटन गेटच्या सुशोभिकरण कामाचे भुमिपूजन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) प्रवीण चव्हाण, ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, राजस्थान येथील वन्यजीव बोर्डाचे सदस्य सुनील मेहता, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, मोहर्लीच्या सरपंच सुनिता कातकर, हरीष शर्मा, डॉ. मंगेश गुलवाडे, संध्या गुरुनुले, छायाचित्रण दिग्दर्शक नल्ला मुथ्थू आदी उपस्थित होते.

यावेळी ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत मोहर्ली येथे ७.४२ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या पर्यटन गेटच्या कामाचे भुमिपूजन झाले. वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, विदर्भाला जगाची टायगर कॅपिटल म्हटले जाते. जगातील अनेक मान्यवरांची पाऊले ताडोबाकडे वळतात. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला सन्मानाची वागणूक द्यावी.

वाघासोबतच माणसांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना सुरु आहेत. मानवी जीवन अनमोल आहे. उपजिविकेसाठी जंगलात जाणाऱ्या माणसांवर वन्यप्राण्यांचे हल्ले होण्याचे प्रमाण जास्त आहे. यावर उपाययोजना म्हणून डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेतून गावांना निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. वन विभाग हा केवळ एक शासकीय विभाग नसून तो एक परिवार आहे. ताडोबाचे नाव जगात अधिक चांगले होण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी मनापासून काम करावे. जीवनाच्या पहिल्या श्वासापासून शुद्ध ऑक्सीजन चांगल्या पर्यावरणामुळेच मिळतो असेही वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.

मोहर्ली गाव पर्यटकीय सेवा केंद्र होणार

ताडोबाचे मुख्य आकर्षण असलेल्या मोहर्ली गावाच्या सर्वंकष सुंदरतेसाठी आराखडा तयार करण्यात येईल. मोहर्ली गावासाठीही आकर्षक प्रवेशद्वार उभारण्यात येईल. गावात पायाभूत सुविधांसोबतच आर्किटेक्चरच्या माध्यमातून गावातील भिंती रंगविणे, आकर्षक मूर्ती लावणे आदी बाबींमधून पर्यटकीय सेवा केंद्र म्हणून मोहर्ली नावारुपास येईल.

ताडोबातील वाघांची स्थलांतर प्रक्रिया : चंद्रपूरात वाघांची संख्या लक्षणीय वाढल्यामुळे स्थलांतर करण्यात येत आहे. ताडोबातील दोन वाघिणींना नागझिरा अभयारण्यात पाठविण्यात आले. तर पुढे आठ वाघ सह्याद्रीमध्ये सोडण्यासाठी भारत सरकाची परवानगी मागितली आहे.

ताडोबावर आधारीत उत्कृष्ट फिल्मची निर्मिती : प्रसिद्ध छायाचित्रण दिग्दर्शक नल्ला मुथ्थु यांनी अतिशय मेहनत घेऊन माया वाघीण आणि तिच्या बछड्यांवर आधारीत आई-मुलाचे प्रेम दर्शविणारी सुंदर शॉर्टफिल्म तयार केली आहे. मुथ्थु यांनी ताडोबावर आधारीत दर्जेदार 30 – 35 मिनिटांची आकर्षक फिल्म तयार करावी. ही फिल्म मुंबईच्या चित्रपटनगरीत दाखविण्यात येईल. तसेच वाघांची माहिती देणाऱ्या केंद्रासोबातच मोहर्ली येथे सात डायमेंशनयुक्त थिएटर तयार करावे. जेणेकरून वाघांप्रमाणेच येथील थिएटर प्रसिद्ध झाले पाहिजे.

राज्यातील व्याघ्र प्रकल्पाला उत्तम दर्जा :

देशातील सहा व्याघ्र प्रकल्पाला उत्तम मानांकनाचा दर्जा मिळाला आहे. विशेष म्हणजे या सहापैकी तीन व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील आहे. वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसोबतच गावक-यांनीसुध्दा जंगलांचे संवर्धन, संरक्षण केले आहे आणि त्रासही सहन केल्याचे वनमंत्री म्हणाले.

तत्पूर्वी वनमंत्र्यांच्या हस्ते मराठी व्याघ्र गीताचे अनावरण करण्यात आले. तसेच माया वाघिणीवर आधारीत चित्रफितीचे यावेळी लोकार्पण झाले. मोहर्ली पर्यटन गेटच्या सुशोभिकरणासोबतच येथे पर्यटकांसाठी वातानुकूलीत प्रतिक्षालय, उपहार गृह, व्याघ्र प्रकल्पाची सचित्र माहिती देणारे केंद्र, प्रसादन गृहे, भेटवस्तू विक्री केंद्र, पार्किंग व्यवस्था आदी विकसीत करण्यात येणार आहे.

क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी प्रास्ताविक केले. संचालन प्रज्ञा जीवनकर यांनी सूत्रसंचालन केले. वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here