राज्यात प्रो-कबड्डीच्या धर्तीवर ३१ ऑगस्टला प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन -उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई, दि.१९: राज्यात पहिल्यांदाच प्रो-कबड्डीच्या धर्तीवर वरळी येथील इन डोअर स्टेडियममध्ये 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी  ६ ते १० या वेळेत प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.

मुक्तागिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेला बंदरे, युवक व क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर, दहीहंडी समन्वय समितीचे पूर्वेश सरनाईक, गीता झगडे, श्रीकृष्ण पडळकर उपस्थित होते.

मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शन आणि सूचनेनुसार प्रो-गोविंदा स्पर्धा होणार असून गोविंदा पथकातील गोविंदांच्या सुरक्षेसाठी विमा कवच देण्यात आले आहे. यासाठी राज्यभरातील ५० हजार गोविंदांचा विमा उतरविण्यात आला असून मुंबईतील २० गोविंदा पथकांतील तीन हजार ५०० गोविंदांना विम्याचा लाभ होणार आहे.

अपघात होऊ नये यासाठी दहीहंडी समन्वय समितींना सूचना देण्यात आल्या असून त्यानुसार समिती नियमावली तयार करणार आहे. नियमावलीनुसार प्रत्येक स्पर्धकाची काळजी घेतली जाणार असून प्रत्येकाला हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. इनडोअर स्टेडियममध्ये ऑलिंपिकच्या धर्तीवर मॅटचा वापर करण्यात येणार असून गोविंदाचा मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास १० लाख रूपयांची मदत शासनातर्फे करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

गोविंदा खेळाडूंचे कार्यक्रम, स्पर्धा वर्षभर घेण्यावर भर राहणार असून दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. वरळी भागातील इनडोअर स्टेडियमध्ये ४० फूट उंची असल्याने तिथे स्पर्धा आयोजित केल्याची माहिती मंत्री श्री. सामंत यांनी दिली.

प्रो-गोविंदा स्पर्धेतून दर्जेदार खेळाडू तयार होतील- मंत्री संजय बनसोडे

दहीहंडी या पारंपरिक स्पर्धा असून याचे रूपांतर उत्सवात झाले आहे. या स्पर्धेतून राज्याचा नावलौकिक वाढविणारे दर्जेदार खेळाडू तयार होतील, असा विश्वास क्रीडा मंत्री श्री. बनसोडे यांनी व्यक्त केला. या स्पर्धा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येणार असून याला साहसी खेळ म्हणून क्रीडा विभागाने मान्यता दिली आहे. या स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्यावर भर राहणार असल्याचेही, त्यांनी सांगितले.

असे असेल बक्षिस

प्रो-गोविंदा स्पर्धेमध्ये एकूण १६ संघ सहभागी होणार असून पहिले बक्षिस ११ लाख रूपये, दुसरे बक्षिस ७ लाख रूपये, तिसरे बक्षिस ५ लाख रूपये आणि चौथे बक्षिस ३ लाख रूपये ठेवण्यात आले आहे. याचबरोबर महिला संघ आणि अंध गोविंदा पथकांनाही सहभागाबद्दल एक लाखांचे बक्षिस देण्यात येणार आहे.

०००