मुंबई, दि. २२ : राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुंबई, मुंबई (उपनगर), पुणे, ठाणे या जिल्ह्यांतून प्रत्येकी ३ व अन्य जिल्ह्यांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण उत्कृष्ट ४४ गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येणार आहे. राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास रुपये ५ लाख, द्वितीय क्रमांकास रुपये २ लाख ५० हजार व तृतीय क्रमांकास रुपये १ लाख इतक्या रकमेची पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. उर्वरित ४१ गणेशोत्सव मंडळांस राज्य शासनाकडून प्रत्येकी रुपये २५ हजार पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर स्पर्धा निवडीचा तपशील, निवडीच्या निकषांसमवेत अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला आहे. अर्जाच्या नमुन्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु.ल.देशपांडे, महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर ५ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज सादर करावेत. जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
०००