मुंबई दि. २४: “भारतीय सिनेसृष्टीतले एक सालस व्यक्तिमत्व हरपले आहे. पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाच्या काळात चित्रपट सृष्टीसारख्या क्षेत्रात अतिशय उच्च स्थान निर्माण करतांना आणि आयुष्यभर ते स्थान कायम राखतानाही स्वतःवरील आणि आपल्या कुटुंबावरील भारतीय संस्कार जतन करणाऱ्या सीमाताई भारतीयांच्या कायम लक्षात राहतील,” अशा शब्दात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनेत्री सीमा देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
“सीमाताईंच्या व्यक्तिमत्वात साधेपणा आणि सुसंस्कृत, सालसपणा ठासून भरला होता. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत रमेश देव, सीमा देव या दोघांनीही आपआपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते, त्यांच्या जवळपास सर्वच भूमिका अजरामर म्हणाव्यात अशा आहेत. ईश्वर सीमाताईंना सद्गती देवो. या दुःखाच्या काळात मी देव परिवाराच्या सोबत आहे. या दुःखातून लवकर सावरण्याचे बळ ईश्वर देव परिवारास देवो ही प्रार्थना करतो,” असे श्री.मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
०००