लम्पी आजाराला त्वरित आळा घाला ; पशुपालकांनो आपले पशुधन सांभाळा…!!

0
13

लम्पी हा विषाणूजन्य चर्मरोग साथीचा आजार आहे. हा आजार मुख्यत्वे गायींमध्ये आढळून येतो. सर्व वयोगटातील नर व मादी जांनावरांमध्ये हा आजार आढळून येतो. उष्ण व दमट हवामान (कीटकांची वाढ जास्त प्रमाणात ) रोग प्रसार होण्यास अधिक पोषक असते. आजारामुळे मरतुकीचे प्रमाण कमी असले तरी प्रादुर्भाव झालेली जनावरे अशक्त होत जातात. त्यांचे दुग्ध उत्पादन मोठ्या प्रमाणात घटते. काही वेळा गर्भपात होतो व प्रजनन क्षमता घटते. वेळीच उपाययोजना नाही केल्यास मृत्यू होतो. पर्यायाने पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते. या रोगात त्वचा खराब झाल्याने जनावर खूप विकृत दिसते. या आजाराचा प्रसार मुख्यत्वे चावणाऱ्या माशा (स्टोमोकसिस ), डास (एडीस), गोचीड, चिलटे (क्यूलीक्वाईड्स) यांच्यामार्फत होतो. तसेच या आजाराचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने होतो.

भारतात याची पहिली नोंद ऑगस्ट, २०१९ मध्ये ओरिसा राज्यात झाली. तर राज्यात या आजाराचा प्रसार मार्च, २०२० मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे दिसून आला आहे.

राज्यात सन २०२२-२३ मध्ये जळगाव, अकोला, पुणे, नगर, औरंगाबाद, लातूर व बीड जिल्ह्यांत गोवंशीय जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. यावर्षीही हिंगोली जिल्ह्यात लम्पी रोग प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे हिंगोली जिल्हा बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात लम्पी चर्म रोगास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने विशेष सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे. पशुपालकांनी आपल्या पशुधनाची वेळीच काळजी घेतल्यास आपल्या जनावराला लंपी आजाराची लागण होण्यापासून वाचविता येईल.

लम्पी आजाराची प्रमुख लक्षणे :

बाधित जनावरामध्ये या आजाराचा सुप्तकाळ साधारणपणे 2-5 आठवडे एवढा असतो. या आजारामध्ये प्रथम जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते. सुरुवातीस भरपूर ताप येतो. चारा खाणे, पाणी पिणे कमी अथवा बंद होते. दूध उत्पादन कमी होते. त्वचेवर हळूहळू 10-20 मिमी व्यासाच्या गाठी येतात. या आजाराच्या प्रादुर्भावामुळे फुफ्फुसदाह व स्तनदाह आजाराची बाधा पशुमध्ये होऊ शकते. पायावर सूज येऊन काही जनावरे लंगडतात. रक्तातील पांढऱ्या पेशी व प्लेटलेटची संख्या कमी होते.

पशुपालकांनी घ्यावयाची काळजी :

तापीच्या कालावधीमध्येच जनावरास उपचार होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे चारा कमी खाणाऱ्या जनावराचा तात्काळ ताप मोजावा व नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून उपचार करुन घ्यावा. बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावीत. कोणत्याही संभाव्य रोगी जनावरास निरोगी जनावरांच्या कळपात प्रवेशास बंदी करणे. रोग प्रादुर्भाव झालेल्या गावातील बाधित जनावरांना चराऊ कुरणांमध्ये एकत्रित सोडण्यास मनाई करणे. डास, माशा, गोचिड व तत्सम कीटकांचा पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधांचा वापर करुन बंदोबस्त करणे. तसेच निरोगी जनावरांच्या अंगावर कीटक येऊ नयेत म्हणून औषध लावणे व गोठ्यामध्ये यासाठीच्या औषधांची फवारणी करणे. आजारी जनावरांवर विषारी औषध फवारणी करु नये. रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील जनावरांना रोग प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी तसेच जनावरांच्या स्थानिक बाजारांमध्ये नेण्यास प्रतिबंध करणे. त्वचेवरील गाठीचे जखमेत रुपांतर झाल्यास जखमेत जंतू पडू नये यासाठी जखमेवर औषधी मलम लावावे. पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार प्रतिबंधक लसीकरण करुन घ्यावे. प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 मधील कलम 4(1) अन्वये पशूंमध्ये या रोगाची लक्षणे आढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती, अशासकीय संस्था, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था इ. यांनी लेखी स्वरुपात नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे.

हिंगोली जिल्ह्यात लम्पी रोग प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे हिंगोली जिल्हा बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या लम्पी रोग प्रादुर्भाव वाढलेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष वार रुम तयार करण्यात आले आहे. या वार रुमध्ये जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.एम. आर. रत्नपारखी यांच्या नियंत्रणाखाली लम्पी प्रादुर्भावामुळे मृत पशुधनाचे अर्थसहाय्याचे प्रस्ताव त्वरित मागवून पशुपालकांना अनुदान देणे सुलभ होण्यासाठी खालील अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. आर. ए. कल्यापूरे (मो. 9518399323), सहायक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, हिंगोली, डॉ. एस.बी.खुणे (मो. 9850737324), जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली, डॉ.डी.ए.टाकळीकर (मो. 9881480083), सहायक आयुक्त पसं जिपवैसचि, हिंगोली, डॉ. एस. पी. पवार (मो. 9665138403) , पशुधन विकास अधिकारी, जिपवैसचि, हिंगोली, व्ही. आर. पोटे (9822073595), पशुधन पर्यवेक्षक, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, हिंगोली, के. के. शेवाळकर (9075097483), डाटा एंट्री ऑपरेटर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, हिंगोली यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

लम्पीचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यातील पशुपालक तसेच क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन करणे व शंकाचे निरसन करणे यासाठी तालुकानिहाय पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती सर्व तालुके यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

तालुकास्तरीय नियंत्रण कक्षामध्ये हिंगोली  तालुक्यासाठी डॉ. जेजेराम केंद्रे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती (मो.8788885187) यांची, वसमत तालुक्यासाठी डॉ. प्रिया धुतराज, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती (मो. 9527417019), कळमनुरी तालुक्यासाठी डॉ.नंदकिशोर जाधव, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती (मो. 9960784664), औंढा नागनाथ तालुक्यासाठी डॉ. जेजेराम केंद्रे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती (मो.8788885187) व सेनगाव तालुक्यासाठी डॉ. श्रीकांत देवकर, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती (मो. 7498203408) यांची नेमणूक करण्यात आली आहे.

लम्पी आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

०००

-चंद्रकांत कारभारी, माहिती सहायक, जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here