लातूर, दि.01 (विमाका) : लातूर विभागीय अधिस्वीकृती समिती – २०२३ ची पहिली बैठक आज लातुरच्या शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार विजयकुमार जोशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. लातूर जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
या बैठकीस माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लातूर विभागाच्या उपसंचालक डॉ.सुरेखा मुळे, विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य सर्वश्री अमोल अंबेकर, अझरोद्दीन रमजान शेख, नरसिंह घोणे, प्रल्हाद उमाटे, यांच्यासह नांदेड जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, उस्मानाबाद जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, हिंगोली जिल्हा माहिती अधिकारी अरूण सूर्यवंशी, लातूर विभागीय माहिती कार्यालयाचे सहायक संचालक डॉ. श्याम टरके, माहिती अधिकारी तानाजी घोलप, उपसंपादक रेखा गायकवाड आदी उपस्थित होते.
उपसंचालक डॉ. मुळे यांनी नवनियुक्त अध्यक्ष श्री. जोशी व समिती सदस्यांचे शाल, पुष्पगुच्छ, ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. अधिस्वीकृती समितीचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. जोशी यांनी शासकीय अधिकारी व समिती सदस्यांच्या समन्वयातून अधिकाधिक पत्रकारांना न्याय देऊ. विभागीय अधिस्वीकृती समितीवर माझी पहिल्यांदाच निवड झाली. सर्व समिती सदस्यांच्या परस्पर सहकार्यातून सकारात्मकदृष्टीने काम करण्याचा त्यांनी मनोदय व्यक्त केला. पात्र असलेल्या पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देण्यासाठी समिती सदैव तत्पर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. समितीचे सदस्य श्री. उमाटे, श्री. शेख यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
***