मुंबई, दि. २: चंद्रयान-३ च्या यशस्वी स्वारीनंतर सौर मोहिमेतील आदित्य एल-१ हे भारताचे पहिले सूर्ययान आज सूर्याच्या दिशेने यशस्वीपणे झेपावले. यशस्वी चंद्र मोहिमेनंतर अवकाश संशोधन क्षेत्रातील जागतिक सत्ता बनलेल्या भारताने आज अवकाश महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, चंद्रयान आणि आता सूर्ययानाच्या माध्यमातून भारतीय अवकाश संशोधन संस्थेने आपल्या देशाला अवकाश संशोधन क्षेत्रात जागतिक ओळख, वलय, विश्वास मिळवून दिला आहे. यापुढे देखील अनेक अवकाश मोहिमा राबवून देशाच्या, जगाच्या संशोधन क्षेत्राच्या विकासात मोठी भर घालण्यात आपण यशस्वी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
भारताच्या या गौरवशाली वाटचालीत योगदान देणाऱ्या सर्व आजी-माजी वैज्ञानिक, तंत्रज्ञ, अभियंता, अधिकारी-कर्मचारी आणि समस्त भारतीयांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.
०००